उद्रेक न्युज वृत्त
आरमोरी :- तालुक्याच्या वैरागड जंगल परिसरात मागील काही दिवसांपासून वाघाचा धुमाकूळ सुरु आहे.दररोज नागरिकांना आवागमन करताना वाघाचे दर्शन होत आहे.दरम्यान,मंगळवारला वाघाने शेतक-याच्या अंगावर उडी घेतली.मात्र प्रसंगावधान राखून त्याने झाडाची फांदी हाती घेऊन आपला जीव वाचविल्याची थरारक घटना वैरागड नजीकच्या सोनपूर येथे घडल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.प्राप्त माहितीनुसार, मंगळवारला वैरागड येथून जवळच असलेल्या सोनपूर येथील शेतकरी रमेश डोंगरवार हे चामोर्शी चक येथील आपल्या शेतात गेले होते.तेथून परत येत असताना सायकल वरून लघुशंकेसाठी ते खाली उतरले. यादरम्यान, जंगली झुडूपात दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक त्यांच्यावर हल्ला केला.त्यामुळे त्यांची भंबेरी उडाली.त्यांनी जवळच असलेल्या एका झाडाची डहाळी उचलली असता,वाघ थोडा बाजुला गेला.वाघ दूर जाताच संधी साधून त्यांनी तिथून पळ काढला असता; ते खड्ड्यात पडले. त्यामुळे ते जखमी झाले.कसेबसे स्वतःला सावरत त्यांनी गाव गाठले.घडलेला प्रसंग गावकऱ्यांना सांगितला.त्यांच्या कमरेला दुखापत झाल्याने नागरिकांनी त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र वैरागड येथे उपचाराकरीता भरती केले.हल्ली वाघ,वाघीण यांच्या हल्ल्याच्या घटना देसाईगंज तसेच आरमोरी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर घडीत असल्याचा प्रकार निदर्शनास येऊ लागला आहे.त्यामुळे वन्य जीव व मानवी संघर्ष टाळण्याकरिता त्वरित उपाययोजना वन विभागाने करण्यात यावी; अशी मागणी शेतकरी बांधव व सर्वसामान्य नागरिकांनी केली आहे.