- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-वनहक्क पट्टेधारकांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.वनहक्क कायद्यांतर्गत पात्र ठरलेल्या अनुसूचित जमाती आणि इतर पारंपरिक वननिवासींना आता सुधारित सातबारा मिळणार असल्याने वनहक्कपट्टेधारक शेतकऱ्यांना शेतकरी म्हणून स्वतंत्र ओळख मिळणार आहे.विशेष म्हणजे,पूर्वी वनहक्कपट्टेधारकांची नोंद सातबारावरील इतर हक्क सदरात होत असल्याने त्यांना शेतकरी म्हणून ओळख मिळण्यात आणि पिकांची नोंद करण्यात अडचणी येत होत्या.परिणामी,हजारो पट्टेधारक पीक कर्ज,पीक विमा,कृषी अनुदान,नैसर्गिक आपत्ती भरपाई आणि ॲग्रीस्टॅक शेतकरी ओळख क्रमांक यांसारख्या योजनांपासून वंचित राहत होते.यासाठी सरकारने महाराष्ट्र जमीन महसूल नियमांत सुधारणा करून वनहक्कपट्टेधारकांसाठी स्वतंत्र ‘गावनमुना ७-ई’ आणि ‘गावनमुना १२-ई’ लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.या निर्णयामुळे वनजमिनींवरील पिकांची स्वतंत्र नोंद घेता येणार आहे.नव्या नियमांमुळे पट्टेधारकांच्या सर्व अडचणी दूर होऊन त्यांना कृषी योजनांचे लाभ मिळणे सुलभ होईल.पण,या नोंदींमुळे कोणताही नवीन मालकी हक्क निर्माण होणार नसून,तो केवळ प्रशासकीय रेकॉर्ड असेल. विद्यमान पट्टेधारकांचे ७-ई आणि १२-ई अभिलेख ३१ ऑगस्टपर्यंत तयार करण्याचे,तर सातबारा नसलेल्या क्षेत्रांचे संयुक्त सर्वेक्षण करून ३१ डिसेंबरपर्यंत ते पूर्ण करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार,ग्रामपंचायत स्तरावरून वनहक्कपट्टेधारकांची माहिती मागविण्यात येत आहे.मात्र,हक्क केवळ वारसहक्काने हस्तांतरित होईल,जमिनीची विक्री किंवा इतर प्रकारे हस्तांतरण करता येणार नाही; असा स्पष्ट शेरा मिळणाऱ्या नव्या सातबारावर असणार आहे.
- Advertisement -

