उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- भररस्त्यात तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करणे आरमोरी येथील तरुणांच्या चांगलेच अंगलट आले आहे. या प्रकरणी आरमोरी पोलिसांनी चौघांना अटक केली असून एक युवक फरार झाला आहे.
लोकेश विनोद बोटकावार वय २१ वर्षे, लोकमित्र खुशाल ठाकरे वय २५ वर्षे, बादल राजेंद्र भोयर वय २३ वर्षे,पवन मनोहर ठाकरे वय २५ वर्षे व फरार आरोपी राहुल मनोहर नागापुरे वय २८ सर्व रा. बाजारटोली आरमोरी अशी अटक करण्यात आलेल्या युवकांची नावे आहेत.प्राप्त माहितीनुसार, आरमोरी शहरातील रामाळा मार्गावर २५ नोव्हेंबर रोजी रात्री ११.३० वाजताच्या दरम्यान काही तरुण एकत्र येवुन गोंधळ/आरडा ओरड करत असताना आरमोरी पोलिसांना दिसून आले. त्यांच्याजवळ जावुन चौकशी केली असता,लोकेश बोटकावार, लोकमित्र ठाकरे,बादल भोयर,पवन ठाकरे, राहुल नागापुरे हे गाडीच्या सीटवर केक ठेवुन अवैधरित्या तलवार बाळगुन केक कापत असताना आढळून आले. अवैधरित्या तलवारीने केक कापणे हा गंभीर स्वरुपाचा गुन्हा असल्याने चौघांना ताब्यात घेवुन त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला. तर एक जण फरार झाला.सदर कारवाईत १५०० रुपये किंमतीची एक धारदार,टोकदार तलवार,५५ हजार रुपये किंमतीची एक जुनी एमएच ३३ एए १३४० क्रमांकाची दुचाकी,४० हजार रुपये किंमतीची एक जुनी एमएच ३३ वाय ७८५४ क्रमांकाची दुचाकी असा एकुण अंदाजे ९६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.सर्व आरोपींविरुद्ध कलम ४/२५ भारतीय हत्यार कायदा १९५९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फरार आरोपीचा शोध सुरु असुन अधिक तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि संतोष कडाळे करीत आहेत.सदर कारवाई पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या आदेशान्वये,अप्पर पोलिस अधीक्षक कुमार चिंता,यतिश देशमुख,एम. रमेश,उपविभागीय पोलिस अधिकारी मयुर भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस स्टेशन आरमोरीचे ठाणेदार संदीप मंडलीक व पोलिस अंमलदारांनी केली.

