उद्रेक न्युज वृत्त
मूल(चंद्रपूर) :- तालुक्यातील येरगाव येथील उपकेंद्र इमारतीच्या दुरुस्तीचे कंत्राट मिळवण्यासाठी ग्रामपंचायतीने गट्टूचा ठराव केला.जेव्हा कंत्राट मंजुरीला प्रस्तावित करण्यात आले, तेव्हा गट्टू लावण्याचे काम तर २ ते ३ लाखांत पूर्ण होत असल्याने त्यात खाडाखोड करून नाली दुरुस्ती जोडण्यात आली.ठरावाच्या तारखेत खाडाखोड करून मिळवलेल्या कंत्राटदारांचे बिल चौकशीच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.आरोग्य उपकेंद्र,येरगाव येथील दुरुस्तीचे काम मागील वर्षीच १५ लाख रुपये खर्च करून करण्यात आले.असे असले तरी पैसे कमविण्याच्या नादात ग्रामपंचायतीने पुन्हा दुरुस्तीचा ठराव जिल्हा परिषद,चंद्रपूरच्या जिल्हा आरोग्य विभागाकडून मंजूर करून घेतल्याचे दिसून येते.या कामाला जिल्हा परिषद,चंद्रपूरने १ ऑगस्ट २०२३ रोजी प्रशासकीय मान्यता दिली.हे काम १२ लाख ५३ हजार ४०६ रुपयांचे आहे.
ग्रामपंचायतीचा ठराव गट्ठ लावण्यासंदर्भात असताना व यापूर्वीच उपकेंद्राची दुरुस्ती करण्यात आली असताना पुन्हा याच उपकेंद्राच्या दुरुस्तीसाठी ठराव करण्यात आला.मात्र, किंमत कमी असल्याने जुन्याच ठरावाच्या तारखेत खाडाखोड करून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला व तो मंजूरही करण्यात आला.खाडाखोड करण्यात आलेल्या कागदपत्रांमध्ये ग्रामपंचायतीचा मासिक ठराव, देखभाल-दुरुस्ती प्रमाणपत्र, ना हरकत प्रमाणपत्र, गावठाण प्रमाण- पत्राचा समावेश आहे. खाडाखोड करून सादर केलेल्या कागदपत्रांची चौकशी होणे आवश्यक आहे.

