- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देसाईगंज येथील विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या क्रांतीवीर बाबुराव शेडमाके ‘कमवा व शिका’ योजनेअंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.श्रीराम गहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील आर्थिकदृष्ट्या गरजू व होतकरू विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.या योजनेंतर्गत एकूण ४० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून,निवड झालेल्या विद्यार्थ्यांना योजनेची उद्दिष्टे,कार्यपद्धती,विद्यार्थ्यांची भूमिका आणि उपलब्ध संधी याबाबत माहिती देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमात विद्यार्थी विकास विभागाचे विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.डॉ.निलेश हलामी यांनी विद्यार्थ्यांना ‘कमवा व शिका’ योजनेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.शिक्षण घेत असतांना विद्यार्थ्यांना कामाची संधी मिळावी,त्यातून त्यांना आर्थिक मदत व्हावी तसेच विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबन,श्रमप्रतिष्ठा,जबाबदारी आणि कार्यकौशल्य विकसित व्हावे,हा या योजनेमागील प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आर्थिक परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळे निर्माण होऊ नयेत,यासाठी अशा योजनांचा उपयोग महत्त्वाचा ठरतो.विद्यार्थ्यांनी उपलब्ध संधीचा योग्य उपयोग करून शिक्षणासोबत कामाचा अनुभव मिळवावा आणि भविष्यात स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी आवश्यक कौशल्ये विकसित करावीत,असे आवाहन प्रा.डॉ.निलेश हलामी यांनी केले.
तसेच योजनेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन शिक्षणाला प्राधान्य देत दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी,वेळेचे योग्य नियोजन करावे आणि मिळणाऱ्या कामाच्या अनुभवाचा भविष्यातील करिअरसाठी उपयोग करावा,असेही मार्गदर्शन करण्यात आले.
या मार्गदर्शन कार्यक्रमामुळे निवड झालेल्या ४० विद्यार्थ्यांना योजनेची कार्यपद्धती व त्यांच्यावर असलेल्या जबाबदाऱ्यांची स्पष्ट माहिती मिळाली. विद्यार्थी विकास विभागाच्या या उपक्रमाचे विद्यार्थ्यांकडून स्वागत करण्यात आले.
- Advertisement -

