उद्रेक न्युज वृत्त
कुरखेडा(गडचिरोली) :- गडचिरोली जिल्हा मुख्यालयाजवळील पोर्ला वनपरिक्षेत्रातून कुरखेडा तालुक्यात दाखल झालेल्या जंगली हत्तींच्या कळपाने मागील १५ दिवसांपासून तालुक्यात धुमाकूळ घातला आहे.काल,२२ मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास हत्तींनी चिनेगाव शेतशिवारात प्रवेश करून शेतातील झोपडी, भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान केले आहे.त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात दाखल झालेल्या जंगली हत्तींनी जिल्ह्यातील जंगलांचा जणूकाही ताबाच घेतला असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे गेल्या ३ वर्षांपासून जंगली हत्ती जिल्ह्यात भ्रमंती करीत आहेत.
रानटी हत्तींनी कुरखेडा तालुक्याला आपले अधिवास बनवले आहे.महिनाभरापूर्वी जंगली हत्तींचा कळप पुन्हा कुरखेडा तालुक्यात परतला आहे.सध्या येथे जंगली हत्तींचा धुमाकूळ सुरू आहे.दोन दिवसांपूर्वी हत्तींनी कुरखेडा तालुक्यातील पळसगाव-चांदागड परिसरात धुमाकूळ घातला होता.
हत्तींचा कळप काल,बुधवारी दिनांक- २२ मे रोजी मध्यरात्री कुरखेडा वन परीक्षेत्रातील चिनेगाव शेतशिवारात पोहोचला.येथे जंगली हत्तीच्या कळपाने कमल दादाजी दुमाने रा.चीनेगाव यांच्या शेतातील खोपडी,प्लास्टिक पाइप,बोअरवेलचे नुकसान केले. देविदास धाडूजी जुमनाके रा.चीनेगाव यांचे प्लास्टिक पाइप,चवळी व गवार रोपांचे नुकसान केले.सदर नुकसानाचा पंचनामा व पाहणी करण्यासाठी गोठणगावचे क्षेत्र सहाय्यक डी.डी.उईके,चांदागडचे वनरक्षक एस.एम.दुर्गे मोक्यावर हजर होते.कुरखेडा वनपरिक्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून हत्ती तळ ठोकून आहेत.त्यामुळे गावकरी दहशतीत असून रात्र जागून काढत आहेत.त्याचबरोबर वनविभागाचे पथकही गस्त घालत आहे.

