उद्रेक न्युज वृत्त
आरमोरी(गडचिरोली) :-पावसाळ्याचे दिवस सुरू झाल्याने शेतात व घराच्या आजूबाजूच्या परिसरात अनेक प्रजातींच्या विषारी व बिनविषारी सापांचा वावर जास्त प्रमाणात आढळतो.त्यामुळे सर्पदंश टाळण्यासाठी नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी. विशेषतः शेतकऱ्यांनी शेतीचे कामे करताना खबरदारी घेण्याचे आवाहन आरमोरी वृक्षवल्ली वन्यजीव संरक्षण संस्थेने केले आहे.पावसाला सुरुवात झाली असून,शेतीकामाला वेग आला आहे.पावसाचे पाणी बिळात घुसल्याने साप बिळातुन बाहेर पडतात.शेतात गवताचे प्रमाण अधिक असल्याने त्या ठिकाणी दबा धरून बसतात.आपण न कळत त्यावरून चालतो किंवा गवत साफ करण्याचा प्रयत्न करतो.अशावेळी विषारी सापाने दंश केल्याने अनेक शेतकरी, शेतमजुरांना नाहक जीव गमवावा लागतो.त्यासाठी शेतावर जाताना बांधावर,गवत कापताना काठीचा आधार घेत्यास अनुचित घटना टाळता येईल.
२० प्रकारच्या सापात पाच विषारी साप असतात. जिल्ह्यात एकूण १९ ते २० प्रकारचे साप आढळून येतात.त्यापैकी केवळ ५ साप विषारी आहेत.त्यामध्ये नाग,मण्यार,घोणस,फुरसे आणि पट्टेरी मण्यार हे विषारी साप असून,हरणटोळ,माजन्या,उडता सोनसर्प हे निमविषारी गटात मोडतात.याखेरीज १४ बिनविषारी साप आढळतात.यामध्ये पानदिवट (धोंड्या),नानेटी (वासुदेव),धामण,तस्कर,डुरक्या घोणस (फुरफुरी),धूळनागीण,कुकरी,गवत्या,रुखा, (वेल्या) कवड्या,सोंगाट्या,अजगर,मांडूळ,चंचुवाडा (कानेळा) आदींचा समावेश आहे.
पावसाळ्यात घराजवळील परिसर स्वच्छ ठेवावा, शिळे अन्न घराजवळ टाकू नये.बाहेर फिरताना पायात बूट किवा चपलाचा वापर करावा,अंधारात बॅटरीचा वापर करावा,विटा,दगडाचे ढिगारे,पाला-पाचोळा साफ करताना योग्य ती काळजी घ्यावी.पाळीव प्राणी घरापासून दूर अंतरावर ठेवावेत.या बाबींची खबरदारी घेतल्यास सर्पदंश टाळता येतो.सर्पदंश झाल्यास मानसिक धीर द्यावा,कुठलेही खाद्यपदार्थ देऊ नये, दंशाच्या जागी चिरा देण्याचा प्रयत्न करू नये,रुग्णाला जास्त हालचाल करू देऊ नये,साप हाताला चावल्यास दंडाला,पायाला चावल्यास मांडीला दोरी बांधताना पेन, काडी, बोट टाकून घट्ट बांधावे.गाठ पडल्यानंतर घातलेली वस्तू बाहेर काढावी.एखाद्या व्यक्तीला साप चावल्यास मोठ्या प्रमाणावर घाबरगुंडी होत असते.घबराट सुटल्याने शरीरातील ब्लड प्रेशर वाढून लवकर विष पसरला जातो.त्यामुळेही काहीजण धक्क्यानेच मृत्यू मुखी पडत असतात.ग्रामीण भागातील लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती असल्याने सर्प दंशामुळे ग्रामीण भागात लोकांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. वाघ, हत्ती या वन्यजीव प्राणहानीस मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत केली जाते.यात सापाचा देखील समावेश करून नुकसान भरपाईची तरतूद करावी; असे वृक्षवल्ली वन्यजीव संरक्षण अध्यक्ष देवानंद दुमाने यांनी म्हटले आहे.

