उद्रेक न्युज वृत्त
नवी दिल्ली :-G20 राष्ट्रांच्या परराष्ट्र मंत्र्यांची सध्या नवी दिल्ली मध्ये बैठक सुरू आहे.१ आणि २ मार्च रोजी ही बैठक होणार आहे.G20 म्हणजे ग्रुप ऑफ ट्वेन्टी. हा जगातल्या प्रमुख विकसित आणि विकसनशील देशांचा राष्ट्रगट आहे.१९९९ साली या राष्ट्रगटाची स्थापना करण्यात आली होती.पूर्व आशिया आणि आग्नेय आशियात १९९७ साली आलेल्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर G20 गट उदयास आला. अशा एखाद्या जागतिक आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी प्रमुख देशांनी एकत्र येऊन प्रयत्न करावेत हा त्यामागचा हेतू होता.
G20 राष्ट्रगटात भारताशिवाय अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया,ब्राझील,कॅनडा,चीन,फ्रांस,जर्मनी, इंडोनेशिया,इटली,जपान,दक्षिण कोरिया,मेक्सिको, रशिया,सौदी अरेबिया,दक्षिण आफ्रिका,तुर्की,ब्रिटन, अमेरिका अशा १९ देशांचा समावेश आहे.युरोपियन युनियन ही संघटना या राष्ट्रगटातला विसावा सदस्य आहे.जगातली ६० टक्के लोकसंख्या G20 राष्ट्रांमध्ये राहते.जागाच्या एकूण जीडीपीच्या ८५ टक्के जीडीपी या देशांतून येते.जागतिक व्यापारातील ७५ टक्क्यांहून अधिक व्यापार G20 देशांत एकवटला आहे.साहजिकच या राष्ट्रगटाचे काम अतिशय महत्त्वाचे ठरते.G20 देशांचे कायमस्वरूपी कार्यालय किंवा सचिवालय नाही. अजेंडा आणि समन्वय साधण्याचे काम G20 देशांचे प्रतिनिधी करतात.ज्यांना शेरपा म्हणून ओळखले जाते.दरवर्षी एका देशाकडे G20 चे अध्यक्षपद येते.यालाच G20 प्रेसिडंसी म्हणतात.प्रत्येक प्रेसिडंसीच्या शेवटी G20 राष्ट्रगटाची बैठक होते आणि कारभार पुढच्या अध्यक्षांवर सोपवला जातो.G20 चे विद्यमान अध्यक्ष,आधीचे आणि पुढचे अध्यक्ष राष्ट्र यांच्या मदतीने कारभार चालवातात.यंदा २०२३ चे अध्यक्षपद भारताकडे आहे.भारत यंदा इंडोनेशिया आणि ब्राझीलच्या मदतीने G20 चा कारभार पाहणार आहेत.तसेच यंदाची G20 शिखर परिषद भारतातच होईल.