- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :-महाराष्ट्र राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्या,सोमवार २३ फेब्रुवारीपासून मुंबईत सुरू होणार असून अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच आज,रविवारी परंपरेनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोजित केलेल्या चहापान कार्यक्रमावर विरोधी पक्षांनी पूर्णपणे बहिष्कार टाकला आहे. “सत्ताधारी पक्ष बहुमताच्या मस्तीत असून लोकशाही आणि संविधानाचा कोणताही सन्मान राखला जात नाही.अशा ‘निर्लज्ज’ आणि ‘दुटप्पी’ वागणाऱ्या सरकारच्या चहापानाला आम्ही जाणार नाही,” असा घणाघात ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी आज पत्रकार परिषदेत केला.अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे,भास्कर जाधव यांच्यासह काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत घेत,सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकत असल्याचे सांगितले. “ज्या सरकारच्या काळात शेतकरी संकटात आहेत आणि भ्रष्टाचार शिगेला पोहोचला आहे. राज्यात ड्रग्सची प्रकरणे वाढत आहेत,त्यांच्यासोबत चहा पिणे आम्हाला मान्य नाही,” अशी भूमिका घेत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांविरुद्ध संघर्षाचे संकेत दिले आहेत.अश्यातच सरकारच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या अनेक घटना नुकत्याच घडल्या आहेत.धक्कादायक बाब म्हणजे,२८ जानेवारी रोजी अजित पवारांच्या निधनामुळे संपूर्ण राज्यात दुखवटा आणि शासकीय सुट्टी असतांना अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांना दर्जा देणाऱ्या तब्बत ७५ प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले होते.यावर विरोधक सरकारला धारेवर धरतील.तसेच,मुस्लिम समाजाला जात आणि जातवैधता प्रमाणपत्र देण्याबाबतचा १२ वर्षांपूर्वीचा आदेश सरकारने अधिवेशनाच्या तोंडावर अचानक रद्द केल्याने रोष निर्माण झाला आहे.त्यातच,मुंबईच्या मुलुंडमधील भीषण मेट्रो दुर्घटना आणि राज्यातील बिघडलेली कायदा-सुव्यवस्था या मुद्द्यांवरून अधिवेशनात रणकंदन माजण्याची चिन्हे आहेत.राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या या गदारोळात राज्याच्या विकासाचा गाडा हाकणारा आर्थिक आराखडाही याच अधिवेशनात मांडला जाईल. राज्याचा सन २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प ६ मार्च रोजी दुपारी २ वाजता सादर होणार आहे. विधानसभेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा अर्थसंकल्प मांडतील, तर विधान परिषदेत ही महत्त्वाची जबाबदारी वित्त राज्यमंत्री आशीष जयस्वाल सांभाळतील.राज्यातील वाढती आव्हाने पाहता या अर्थसंकल्पातून जनतेला कोणता दिलासा मिळतो,याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.मुख्यमंत्र्यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी वित्तमंत्री या नात्याने सन २०२३-२४ या वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला होता.
- Advertisement -

