- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-सध्या स्थितीत लिलाव झालेले रेती घाट सर्वत्र बंद स्वरूपात आहेत.घरकुल लाभार्थ्यांना बांधकामासाठी रेती मिळत नाही.अश्यातच इतर बांधकामासाठी रेती चढ्या दराने सहज उपलब्ध होत आहे.सदरची वाहतूक विनारॉयल्टी व ओव्हरलोड असतांना याकडे महसूल व पोलिस विभाग दुर्लक्ष करून लगतच्या भंडारा जिल्ह्यातील रेतीला नागपूर जिल्ह्यात ‘अच्छे दिन’ आलेत.नागपूर जिल्ह्याच्या मौदा शहरापासून अवघ्या १० ते १४ किलोमिटर अंतरावर भंडारा जिल्ह्याची सीमा सुरू होते.नागपूर जिल्ह्यातील कन्हान नदीसोबतच भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीतील तांबड्या रेतीला बाजारात भरीव मागणी आहे.शहरासह तालुक्यात सध्या शेकडो बांधकामे सुरू असून,त्यांना रोज हजारो ब्रास रेतीची आवश्यकता भासते.ही गरज भंडारा जिल्ह्यातून बोलावून पूर्ण केली जाते.रेती घाट बंद असतांना बहुतांश टिप्पर चालकांकडे दोन ते तीन ब्रास रेती वाहतुकीची रॉयल्टी असते आणि ते याच रॉयल्टीवर १० ते १५ ब्रास रेती वाहतूक करतात.रेती विनारॉयल्टी सोबतच ओव्हरलोड देखील असते.या रेतीची वाहतूक रोज रात्री ९ ते दुसऱ्या दिवशी पहाटे ४:३० वाजेपर्यंत सुरू असते.भंडारा जिल्ह्यातील रेती याच तालुक्यातून पुढे नागपूर शहरासह, रामटेक व पारशिवनी तालुक्यात व पुढे वर्धा,अमरावती जिल्ह्यांसह इतरत्र नेली जाते.या रेतीच्या वाहतुकीबाबत महसूल व पोलिस विभागातील प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांना इत्थंभूत माहिती आहे.मात्र,याला आळा घालण्यासाठी ते कुठलीही उपाययोजना करीत नाहीत. कागदोपत्री दाखविण्यासाठी अधूनमधून एक-दोन टिप्पर, ट्रॅक्टर पकडले जातात.मागील दोन महिन्यांपासून ते देखील पूर्णपणे बंद आहे.आर्थिक लागेबांधे असल्याने पकडण्याच्या भानगडीत पडणार कोण?असा सूर उमटू लागला आहे.
- या मार्गांवरून होतेय अवैध रेतीची वाहतूक👇
१.अवैध रेतीची वाहतूक भंडारा जिल्ह्यातील जवाहरनगर,ठाणा येथून मौदा तालुक्यातील निहारवाणी,चिखलाबोडी,दहेगाव, बोरगाव,मौदामार्गे नागपूर.
२.भंडारा जिल्ह्यातील ठाणा,खरबी येथून मौदा तालुक्यातील गोवरी,मोहाडी,बोरगाव,मौदामार्गे नागपूर.
३.भंडारा जिल्ह्यातील सातोना,हत्तीडोई येथून मौदा तालुक्यातील आदासा,घोटमुंढरी,खंडाळा पिपरी, मांगली (तेली),मौदा मार्गे नागपूर तसेच खात, घोटीटोक मार्गे रामटेकच्या दिशेने नेली जाते.या मार्गावर रोज रात्री १५ ते २० टिप्पर विनारॉयल्टी रेती घेऊन जातात.
- Advertisement -

