- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-गावी जाण्यासाठी घरून निघालेले पती-पत्नी दोघेही मोठ्या आनंदात होते.घरातील देवाऱ्यापुढे असलेली फुले व इतर पूजेचे साहित्य नदीत फेकून देण्यासाठी वाटेत असणाऱ्या नदीच्या पुलावर काहीकाळ थांबले व दोघांनीही सेल्फी काढत काही फोटो घेतले.त्याचवेळी पत्नीने अचानकपणे पुलावरून नदीत उडी घेतली आणि क्षणात पाण्यात दिसेनाशी झाली.सर्व काही अचानक घडल्याने पतीने आरडाओरड करत नदीच्या दिशेने धाव घेतली. आजूबाजूच्या लोकांनी गर्दी केली,मात्र तोपर्यंत पत्नीचा थांगपत्ता लागलेला नव्हता.अश्यातच आता शनिवारी ५ जुलै रोजी दुपारी चारच्या सुमारास नागपूर जिल्ह्याच्या कामठी तालुक्यातील नेरी शिवारातील कन्हान नदीच्या पुलावर घडलेल्या घटनेच्या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.विवाहित मृत वैष्णवी आत्महत्या नसून,पतीकडून झालेली हत्या असल्याचा गंभीर आरोप मृतक महिलेच्या आईने केला आहे.माझ्या मुलीला तिच्या पतीनेच नदीत ढकलून दिले,तिने स्वेच्छेने उडी घेतली नाही.शिवाय, तिचा दोन वेळा गर्भपात झाला होता,याची माहिती तिला दिली नव्हती.वैष्णवीला तिचा पती गोळ्या देत असे,त्या आरोग्यासाठी नसून गर्भपातासाठी होत्या, असा आरोप मृतक वैष्णवीच्या आई सरोज शालिक सोमनाथे वय ४२ वर्षे,रा.भुगाव यांनी केला आहे.
मृतक २४ वर्षीय महिला वैष्णवी ऊर्फ ज्ञानेश्वरी शालिक सोमनाथे हिचा विवाह २५ एप्रिल २०२४ रोजी काचूरवाही,ता.रामटेक,जि.नागपूर येथील विजय सेवकराम साकोरे यांच्याशी झाला होता.दोघे नागपूर येथील उदयनगर,गजानन अपार्टमेंटमध्ये राहत होते.५ जुलै रोजी वैष्णवी आणि विजय हे पूजा झाल्यामुळे काचूरवाहीकडे निघाले होते.नेरी शिवारातील कन्हान नदी पुलावर थांबून पूजेचे साहित्य टाकल्यावर सेल्फी घेतली आणि त्यानंतर वैष्णवीने नदीत उडी घेतल्याचे तिच्या पतीने पोलिसांना सांगितले होते.याप्रकरणी नवीन कामठी पोलिस ठाण्यात मर्ग दाखल करण्यात आला होता.एनडीआरएफच्या मदतीने शोध घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ६ जुलै ला मृतदेह सापडला होता.शवविच्छेदनानंतर मृतदेह तिच्या माहेरी देण्यात आला.मात्र,या घटनेनंतर आठवडाभराने मृतक वैष्णवीच्या आई सरोज सोमनाथे यांनी पोलिसांत तक्रार दाखल करून आपल्या मुलीचा खून झाल्याचा आरोप करीत पती विजय साकोरेवर कारवाईची मागणी केली आहे. घटनास्थळी सीसीटीव्ही कॅमेरे नसल्यामुळे पोलिसांसमोर सत्यता पडताळण्याचे आव्हान आहे. मात्र,मृतक महिलेच्या आईच्या तक्रारीनंतर या प्रकरणाचा तपास आता नव्या दिशेने सुरू होण्याची शक्यता आहे.
- Advertisement -

