- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा तालुक्याच्या शिरपूर येथे गावानजीक असलेल्या शेतशिवारातील शेततळ्यात आंघोळीसाठी उतरलेल्या दोन मावस भावंडांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज, रविवार ६ जुलै रोजी सकाळी दहाच्या सुमारास घडली.विहान ज्ञानेश्वर मडावी वय १२ वर्षे रा.शिरपूर, ता.कुरखेडा तर ९ वर्षीय रुदय ज्ञानेश्वर मडावी रा.गडचिरोली असे शेततळ्यात बुडून मृत्यू झालेल्या मृतकांची नावे आहेत.विहान मडावी हा सातव्या वर्गात शिकत होता तर रुदय मडावी हा तिसऱ्या वर्गात होता.विहानचे वडील कुरखेडा तालुक्यात शिक्षक,तर रुदयचे वडील गडचिरोली पोलिस दलात कार्यरत आहेत.दोघांच्याही मृत्यूने कुटुंबियांवर मोठा आघात झाला आहे.९ वर्षीय रुदयची मावशी शिरपूर येथे राहत असल्याने तो मावशीकडे आला होता.आज सकाळच्या सुमारास दोघेही मावस भावंडे खेळत असतांनाच गावानजीक असलेल्या एका नातलगाच्या शेतावर सायकलने गेले होते.शेतावर शेततळा दिसल्याने दोघांनी आंघोळ करण्याचा निर्णय घेतला.सायकल बाजूला ठेवत अंगावरील कपडे काढून पाण्यात उतरले.पावसाचे दिवस असल्याने सध्या स्थितीत शेततळे वा नाले-ओढे पाण्याने भरून आहेत.त्यामुळे खोल पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचाही शेततळ्यात बुडून मृत्यू झाला.शेतावरील काही नागरिकांना शेततळ्याच्या पाळीवर सायकल तसेच कपडे दिसून आल्याने सदरची घटना उघडकीस आली.घटनेची माहिती कुरखेडा पोलिसांना कळताच घटनास्थळी दाखल होत दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.घटनेचा पुढील तपास कुरखेडा पोलीस प्रशासन करीत आहे.
- Advertisement -

