- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-फेंगल चक्रीवादळाचे सावट ओसरले असले तरी ढगाळ वातावरण नागपूर,गडचिरोली व विदर्भातील इतर जिल्ह्यात कायम आहे.ही स्थिती आणखी दोन दिवस कायम राहण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाचीही शक्यता आहे.त्यानंतरच ढगांची गर्दी हटून थंडीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे.थंडीचे हे आवर्तन पुढचे १० दिवस राहील, असा हवामान खात्याने अंदाज दर्शविला आहे.काल रविवारी नागपूरचा पारा १ अंशाने
घसरून १९.२ अंशांवर आला.हे तापमान अद्यापही सरासरीपेक्षा ६.२ अंशांनी अधिक आहे.नागपूरसह विदर्भातील तापमान घसरले आहे.अकोल्याचे किमान तापमान ३.७ अंशांनी घटून १७ अंशांवर आले. अमरावती,यवतमाळ,गडचिरोली,गोंदियाचा पारा २० अंशांच्या खाली आला.दरम्यान,भंडारा येथे काल रविवारी पावसाच्या सरी बरसल्या व ९ मि.मी. पावसाची नोंद झाली.येथील पहाटेचे तापमान २० अंशांचे होते.ब्रम्हपुरीत शनिवारी रात्री जोरदार पाऊस झाला व २५ मि.मी.ची नोंद झाली.वर्ध्याचा पाराही २०.२ अंशांवर आहे.
महाराष्ट्रात सर्वत्र ढगांची गर्दी ओसरून थंडीचा प्रभाव पुन्हा वाढण्याची स्थिती आहे.विदर्भात मात्र थंडीचीही पुन्हा दोन दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.येत्या २४ तासात काही ठिकाणी पाऊस होईल,अशी शक्यता आहे.नागपूरला काल रविवारी आकाश काहीअंशी ढगांनी व्यापले होते.सायंकाळी हे आच्छादन आणखी गडद झाले व पावसाची शक्यता निर्माण झाली होती.ढगांचा वेढा १० डिसेंबरपर्यंत राहण्याची व त्यानंतर पुढचे १० दिवस थंडीत पूर्वीसारखी वाढ होण्याची शक्यता आहे.
- Advertisement -

