- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-सर्वत्र रंगपंचमीचा (शिमगा)उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होत असतांनाच ऐन सणाच्या दिवशीच देसाईगंज शहरातील एका १९ वर्षीय युवकाचा देसाईगंज-ब्रम्हपुरी मार्गावरील वैनगंगा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना आज,शुक्रवारी १४ मार्च रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास उघडकीस आली.अथर्व हिवराज सहारे वय १९ वर्षे,रा.एकता कॉलनी, देसाईगंज,जि.गडचिरोली असे मृत पावलेल्या युवकाचे नाव आहे.
आज सकाळच्या सुमारास सर्वत्र एकमेकांना रंग लावून मोठ्या उत्साहात रंगपंचमी साजरी करण्यात आली. आबालवृद्ध रंगामध्ये न्हाऊन गेले आहेत.अशातच अथर्व सहारे व काही सहकारी मित्र रंग खेळल्यानंतर अंगावरील रंग काढण्यासाठी देसाईगंज-ब्रम्हपुरी मार्गावरील वैनगंगा नदी तीरावर आंघोळीसाठी गेले होते.आंघोळ करीत असतांना अथर्व सहारे खोल पाण्यात उतरला.पाण्याचा अंदाज न आल्याने तो गटांगळ्या खाऊ लागला.सहकारी मित्रांनी आरडा-ओरड केली.त्यातच काही नागरिकांनी धाव घेत वाचविण्याचा प्रयत्न केला.परंतु,अथर्व सहारे खोल पाण्यात गेल्याने क्षणात होत्याचे नव्हते झाले व पाण्यात बुडून मृत्यू झाला.सदर घटनेची माहिती देसाईगंज पोलीस प्रशासनास देण्यात आली.पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतकाचे शव शवविच्छेदनाकरीता देसाईगंज ग्रामीण रुग्णालयात दाखल केला.रात्री उशिरापर्यंत शवविच्छेदनाची प्रक्रिया सुरू होती.अथर्व सहारे याचे वडील हिवराज सहारे हे गडचिरोली जिल्ह्याच्या पोलीस विभागात कार्यरत असून अथर्व बीएससी प्रथम वर्षाचा विद्यार्थी होता.ऐन सणाच्या दिवशीच अनुचित घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
- Advertisement -

