- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-आजकाल चोरट्यांनी झटपट पैसे कमावण्याची नादात नवनवीन फंडे सुरू केले आहेत. काहीजण घरफोड्या करणे,बँकेचे एटीएम फोडणे,चेन स्नॅचींग,दुचाकी वाहन चोरी करणे व इतर नाना तऱ्हेचे हतकंडे सुरू केले आहेत.अश्यातच आता चोरटे पोलीस असल्याची बतावणी करून सर्वसामान्य नागरिकांना लुटू लागले आहेत.अश्याच प्रकारे दोन दिवसांपूर्वी दुचाकीने आलेल्या अनोळखी दोघांनी आपण पोलिस असल्याचा बनाव करीत वयोवृद्ध पुजाऱ्याला लुटून पोबारा केल्याची घटना नागपूर जिल्ह्याच्या रामटेक शहरात उघडकीस आली आहे.सदरची घटना ही रात्रीच्या वेळी नाही तर चक्क दिवसाढवळ्या घडल्याने पोलीसही चक्रावून गेले.
सुरेश लालचंद दुबे वय ७२ वर्षे रा.महात्मा गांधी चौक, रामटेक हे पुजारी म्हणून काम करतात.ते नेहमीप्रमाणे सकाळी पूजा करण्यासाठी अंबाळा तलावाच्या दिशेने पायी जात होते.त्यातच दुचाकीवरून आलेले दोघे अनोळखी तरुण त्यांच्याजवळ थांबले आणि
त्यांनी आपण पोलिस असल्याचा बनाव करीत तुमच्याकडे असलेले सोन्या-चांदीचे दागिने कागदात बांधून ठेवा,’ अशी सूचना केली.त्यामुळे दोघेही पोलिस असावेत,असा सुरेश दुबे यांचा समज झाला आणि त्यांनी त्या दोघांच्या बोलण्यावर विश्वास ठेवत हाताच्या बोटातील पाच ग्रॅमची सोन्याची अंगठी आणि १० ग्रॅमची सोन्याची चेन काढून दोघांपैकी एकाने दिलेल्या कागदावर ठेवली.त्या कागदाची आपण व्यवस्थित पुडी बांधून तुमच्याकडे देतो,अशी बतावणी करीत एकाने ते दागिने स्वतःकडे पुडी बांधण्यासाठी घेतले.त्यानंतर त्याने एक पुडी सुरेश दुबे यांच्या हातावर ठेवली व दोघेही निघून गेले.काही वेळाने दुबे यांनी पुडी सोडून बघितली तेव्हा त्यांना त्या कागदात छोटा दगड बांधला असल्याचे दिसले.त्या दोघांनी आपली फसवणूक करून दागिने पळविल्याचे स्पष्ट होताच त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. चोरट्यांनी २० हजार रुपयांची सोन्याची अंगठी आणि ५० हजार रुपयांची सोन्याची चेन असे एकूण ७० हजार रुपयांचे दागिने पळविल्याप्रकरणी रामटेक पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.एखादा अनोळखी इसम पोलीस असल्याची बतावणी करीत असेल तर त्याची आयडी तपासा,बोलण्यावरून ओळखू शकता की, असली की नकली.नाहीतर तुमच्या जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधून माहिती मिळवा,गोंधळात न जाता घाबरु नका,अनेकजण त्याचाच फायदा घेतांना दिसून येतात.त्यामुळे अश्यांपासून सावध रहा.
- Advertisement -

