उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :- राज्यातील विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत.आगामी विधानसभा निवडणुकांच्या आधी राज्य सरकारकडून सरकारी कर्मचाऱ्यांना खूश करण्याचा प्रयत्न केला जात आहे.याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना मोठे गिफ्ट दिले आहे.सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ करण्यात आली आहे.सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४६ टक्क्यांवरून ५० टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्याबाबतचा शासन निर्णय काढण्यात आला आहे.सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली जावी; अशी मागणी होती.वाढ करण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन होता.त्यानुसार राज्य सरकारने निर्णय घेतला आहे.सातव्या वेतन आयोगानुसार, सुधारीत महागाई भत्त्याचा दर ठरवण्यात आला आहे.याला राज्य सरकारने सुद्धा मंजुरी दिली आहे.त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा ४६ टक्क्यांवरून ५० टक्के करण्यात आला आहे.या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्के वाढ झाली आहे.ही वाढ १ जानेवारी २०२४ पासून लागू होईल.त्यानुसार,जानेवारीपासून जूनपर्यंत असलेली थकबाकी जुलै महिन्याच्या पगारात दिली जाईल,असा शासन निर्णय काढण्यात आला आहे.त्यामुळे राज्य सरकारमधील शासकीय कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.शासकीय,निमशासकीय कर्मचारी, जिल्हा परिषद कर्मचारी या सगळ्यांना हा महागाई भत्ता मिळणार आहे.

