- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-गेल्या पाच दिवसांपासून ग्रामपंचायत स्तरावर कार्यरत असणाऱ्या रोजगार सेवकांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी कामबंद आंदोलन पुकारल्याने गावगाड्यातील मजुरांसह घरकुल लाभार्थी अडचणीत सापडले आहेत.त्यातच ग्रामपंचायत पातळीवरील रोजगार हमी योजना संदर्भातील महत्त्वाची कामे खोळंबली आहेत.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे व्हावी व गावातील लोकांना गावातच काम मिळावे,यासाठी पंचायतराज विभागाकडून प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामरोजगार सेवकांची ग्रामसभेच्या माध्यमातून नियुक्ती करण्यात आली आहे.या रोजगार सेवकांकडे ग्रामपंचायतस्तरावरील अभिलेख व नोंदवह्या ठेवण्यासोबतच इतर जबाबदारी सोपविण्यात आल्याने ते गावातील सरपंच व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या कामातील मदतनीस ठरले आहेत.त्यांच्यावर प्रत्यक्ष काम करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली असली तरी त्यांच्या कामाचे स्वरूप मात्र अर्धवेळ ठरविण्यात आले आहे.त्यांना रोजगार हमी योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या कामांच्या प्रमाणात मानधन मिळणे अपेक्षित आहे. परंतु,अत्यल्प व अनियमित मानधन मिळत असल्याने त्यांच्यासह कुटुंबीयांची फरफट होत आहे.त्यामुळे त्यांनी मानधनाची रक्कम नियमित मिळण्यासाठी राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला. सरकारने त्यांच्या मागण्यांची दखल न घेतल्याने त्यांनी अखेर २ सप्टेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे.
रोजगार सेवकांच्या मानधनाबाबत राज्य सरकारने काही निर्णय घेतले आहेत.त्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी ग्राम पातळीवर काम करणाऱ्या ग्राम रोजगार सेवकांना दरमहा रुपये ८ हजार रुपये मानधन देण्यात यावे.ज्या ग्रामरोजगार सेवकांनी १० हजारापेक्षा अधिक मनुष्य दिवस निर्माण केले आहेत, त्यांना १० हजारांपुढील मनुष्यदिनाच्या अकुशल मजुरी खर्चाच्या दोन टक्के प्रोत्साहन मानधन अतिरिक्त देण्यात यावे.दोन हजार दिवसापर्यंत मनुष्य दिवस निर्मिती करणाऱ्या ग्रामरोजगार सेवकांना प्रतिमाह एक हजार रुपये आणि २,००१ व त्यापेक्षा अधिक मनुष्य दिवस पूर्ण करणाऱ्यांना दोन हजार रुपये प्रतिमाह प्रवास भत्ता तसेच डेटा पॅकसाठी मानधन द्यावे,या निर्णयाचा समावेश आहे.मात्र,अजून पर्यंत कुठल्याही प्रकारची अंमलबावणी सरकारने केली नसल्याने रोजगार सेवकांकडून कामबंद
आंदोलन पुकारण्यात आले आहे.कामबंद आंदोलनाचा फटका सध्या स्थितीत घरकुल लाभार्थ्यांना बसू लागला आहे.घरकुल बांधकामातील काही रक्कम ही रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून निघत आहे.अश्यातच कामबंद आंदोलनामुळे हजेरीपत्रक(मस्टर)निघत नसल्याने लाभार्थ्यांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
- Advertisement -

