उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील पापडा बु.येथील छप्परबंद मुस्लीम शिक्षण संस्थेच्या शाळेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून तब्बल ४५ लाख ५० हजार रुपयांनी फसवणूक करणाऱ्या सहा आरोपींविरुद्ध नागपूरच्या पाचपावली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी संस्थेचा ७० वर्षीय संस्थापक लतीफ पठाण,अध्यक्ष आरिफ लतीफ पठाण वय ४५ वर्षे,गौसिया प्राथमिक व माध्यमिक शाळा एकता कॉलनी नागपूरच्या मुख्याध्यापिका निखत अफरोज मोहम्मद अफजल,मोहम्मद अफजल वय ४२ वर्षे, रा.एनआयटी ग्राउंड,एकता कॉलनी,यशोधरानगर,जुबेदा बी शाळा,रहमतनगर चौक,वांजराच्या मुख्याध्यापिका राहील अमरिन कुरेशी आणि अब्दुल गफ्फार अब्दुल सत्तार कुरेशी वय ७७ वर्षे,रा.नवा नकाशा,लष्करीबाग, नागपूर अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.आरोपींनी फरहीन अफशा शेख वय ४१ वर्षे,रा. नवा नकाशा,लष्करीबाग,नागपूर व त्यांचा भाऊ शेख इरशाद शेख करीम आणि बहीण अमरिन अफशा व त्यांच्या सहकाऱ्यांना अल्पसंख्याक छप्परबंद मुस्लीम शिक्षक संस्थेद्वारा संचालित शाळेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखविले.या संस्थेला शासनाकडून कोणतेही अनुदान मिळत नसून,आरोपींनी ही शाळा शंभर टक्के अनुदान तत्त्वावर सुरु असल्याची बतावणी करून वेळोवेळी ४५ लाख ५० हजार रुपये घेऊन त्यांना नोकरी लावून न देता त्यांची फसवणूक केली.या प्रकरणी फरहीन अफशा शेख यांच्या तक्रारीवरून नागपूरच्या पाचपावली पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.अश्यातच आरोपींनी आणखी काही जणांची फसवणूक केली असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन पाचपावली पोलिसांनी केले आहे.

