- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-नागपूर शहराच्या वाहतूक विभागातील खंडणीच्या कथित प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी कॉटन मार्केट वाहतूक विभागात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक(एपीआय)रवींद्र शेडगे यांना निलंबित केले आहे.या कारवाईमुळे वाहतूक विभागात एकच खळबळ उडाली आहे.
एपीआय शेडगे यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.त्यात ते संजय ट्रॅव्हल्सच्या बसमधील एका कर्मचाऱ्याकडून पैसे स्वीकारतांना दिसल्याचा दावा करण्यात आला.हा व्हिडिओ समोर आल्यानंतर,अधिकाऱ्याच्या भूमिकेवर आणि वाहतूक विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. सदरचे प्रकरण गंभीर घेत पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी शेडगे यांना निलंबित केले.
कॉटन मार्केट वाहतूक शाखा विभागातंर्गत गणेशपेठ परिसर येतो.या परिसरात मोठ्या प्रमाणात खासगी ट्रॅव्हल्स उभ्या असतात.त्यांच्यावर कारवाईसाठी वाहतूक पोलिस या परिसरात असतात.या ट्रॅव्हल्सकडून वाहतूक पोलिसांद्वारे वसुली केल्या जात असल्याचा एक व्हिडिओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता.त्यानंतर याबाबत पोलिस आयुक्तांकडे एक लेखी तक्रार देण्यात आली होती.त्यावरून त्यांनी पोलिस उपायुक्त आदित्य मिरखेलकर यांना चौकशीचे आदेश दिले.मिरखेलकर यांनी सहाय्यक पोलिस आयुक्त गिरीश बने यांच्या अखत्यारीत चौकशी समिती नेमली.या समितीद्वारे केलेल्या चौकशीमध्ये सहाय्यक पोलिस निरीक्षक रवींद्र शेडगे हे वसुली करीत असल्याची माहिती समोर आली होती.त्यानुसार त्यांच्यावर ठपका ठेवून त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव पोलिस आयुक्तांकडे पाठविला. त्यानंतर शेडगे यांना निलंबित करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली.
- Advertisement -

