- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-कोल्हापूर जिल्ह्याच्या शिरोळ तालुक्यातील नांदणी गावातील महादेवी,जिला ‘माधुरी’ म्हणतात,स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठात १९९२ पासून वास्तव्यास असलेली ३६ वर्षीय हत्तीण आहे.ती मठाचा आणि गावकऱ्यांचा अविभाज्य भाग होती.तिला गुजरातमधील वनतारा प्राणी संवर्धन केंद्रात हलवण्याच्या न्यायालयीन निर्णयामुळे ती चर्चेत आहे, ज्याला स्थानिकांनी तीव्र विरोध केला.
पेटा (PETA) या प्राणी हक्क संघटनेने आरोप केला की,महादेवीचा वन विभागाच्या परवानगीशिवाय मिरवणुकीसाठी वापर केला जात होता.यानंतर प्रकरण न्यायालयात गेले.मुंबई उच्च न्यायालयाने डिसेंबर २०२४ मध्ये तिच्या आरोग्य आणि कल्याणासाठी तिला गुजरातमधील वनतारा प्राणी संवर्धन केंद्रात हलवण्याचा आदेश दिला.सर्वोच्च न्यायालयाने २९ जुलै २०२५ रोजी ही याचिका फेटाळून तिच्या स्थलांतराला मान्यता दिली.
वनतारा हे गुजरातमधील जामनगर येथील रिलायन्स फाऊंडेशनद्वारे संचालित प्राणी संवर्धन केंद्र आहे.येथे प्राण्यांचे संरक्षण आणि पुनर्वसन केले जाते. महादेवीला तिच्या आरोग्य आणि कल्याणासाठी या केंद्रात हलवण्यात आले,कारण ती साखळ्यांनी बांधलेली होती आणि तिच्या पायांना जखमा आणि मानसिक त्रास होता,असा दावा करण्यात आला आहे.
अश्यातच आता महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी राज्य सरकार आणि मठ पुनर्विचार याचिका दाखल करणार आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि लोकप्रतिनिधी व संबंधितांच्या बैठकीत आज,मंगळवार ५ ऑगस्ट रोजी निर्णय घेण्यात आला आहे.अजित पवार,चंद्रकांत पाटील,गणेश नाईक,हसन मुश्रीफ,गिरीश महाजन,प्रकाश आंबीटकर या बैठकीत उपस्थित होते. तसेच नांदणी मठाच्या प्रतिनिधींसबोत प्रकाश आवाडे, राजू शेट्टी,सतेज पाटील,सदाभाऊ खोत,धैर्यशील माने आणि इतरही लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
३४ वर्षांपासून माधुरी हत्तीण नांदणी मठात असून, हत्तीण परत आली पाहिजे,ही आपल्या सर्वांची इच्छा आहे.मठाने एक याचिका दाखल करावी आणि सोबतच राज्य सरकार सुद्धा एक याचिका दाखल करेल असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
हत्तीणीची निगा राखण्यासाठी डॉक्टरसह राज्य सरकार एक टीम तयार करेल,आणि तसे सुप्रीम कोर्टात सांगेल.तिची निगा राखण्यासाठी राज्य सरकार आवश्यक ती सर्व मदत करेल.रेस्क्यू सेंटर, आहार याबाबतीत सुद्धा राज्य सरकार आपल्या याचिकेत सुप्रीम कोर्टाला आश्वस्त करेल.राज्य सरकार पूर्ण ताकदीने नांदणी मठाच्या सोबत असेल असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.राजू शेट्टी यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधतांना म्हटले की, “पेटा या तथाकथित प्राणीमित्र संघटनेने कशाप्रकारे बनाव करुन सर्वच हत्ती वनताराकडे जाण्यासाठी प्रयत्न केले ते आम्ही कागदपत्रांसह दाखवून दिले आहे.माधुरी शारिरीकदृष्ट्या फिट आहे; यासंदर्भात वेगवेगळे आठ रिपोर्ट असतांना,४८ तास प्रवास करुन तिथे पोहोचल्यानंतर अनफिट कशी झाली.तिला संधिवात, फॅक्चर कसे झाले? याचे उत्तर शासनाने वनताराकडून घ्यावे अशी मागणी आम्ही केली आहे”.असे राजू शेट्टी म्हणाले.
- Advertisement -

