- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-क्षुल्लक वाद आणि बेदम मारहाण करणारी घटना नागपूर शहराच्या वाडी पोलिस ठाण्यात घडली आहे.दोन बीट मार्शल्सने नक्षलविरोधी अभियानाच्या पोलिस निरीक्षकालाच एका बारमधून ओढत ठाण्यात नेले आणि तेथे त्याला बेदम मारहाण केली.आश्चर्याची बाब म्हणजे निरीक्षकाने स्वतःची ओळख सांगितल्यावरदेखील मारहाण सुरूच होती.या प्रकारामुळे पोलिस वर्तुळात खळबळ उडाली आहे. जर दुसऱ्या युनिटमधील पोलिस अधिकाऱ्यांनाच अशी वागणूक मिळत असेल तर सामान्य नागरिकांनी कुणाकडे जावे आणि हा वर्दीचा माज आहे की त्याच्याआड सुरू असलेले जंगलराज आहे,असा सवाल उपस्थित होत आहे.
संबंधित पोलिस निरीक्षक नक्षलविरोधी अभियान येथे कार्यरत आहेत.शुक्रवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास ते ग्रँड बार येथे जेवायला गेले होते.त्यावेळी तेथे दोन ग्राहकांमध्ये किरकोळ वाद झाला.
निरीक्षकाने पुढाकार घेत मध्यस्थी केली व त्यांच्यातील वाद मिटविला.प्रकरण शांत झाल्यावर सर्वजण आपापल्या टेबलवर बसले.दरम्यान,कुणीतरी दिलेल्या माहितीच्या आधारे दोन बिट मार्शल्स बारमध्ये पोहोचले.त्यांनी इतरांना याबाबत विचारायला सुरुवात केली.निरीक्षक जवळच उभे असल्याने त्यांनी त्यांनादेखील विचारले.निरीक्षकाने किरकोळ वाद होता,असे सांगितले.मात्र,दोन्ही कर्मचारी त्यांनाच बळजबरीने पोलिस ठाण्यात घेऊन गेले.त्यांनी काहीही कारण नसतांना निरीक्षकाला पट्टयाने बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.
निरीक्षकाने स्वतःची ओळखदेखील सांगितली.मात्र, कर्मचाऱ्यांनी काहीच ऐकले नाही.त्यात निरीक्षकाच्या कपाळाला जखम झाली व कानाचा पडदा फाटला. त्यातून बराच वेळ रक्तस्त्राव होत होता.अखेर ठाण्यातील काही कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी केल्यामुळे निरीक्षकाला सोडण्यात आले.निरीक्षकाने पोलिस ठाण्यात तक्रार केली.
पोलिसांनी पंकज मडावी या कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.याबाबत वाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेश तटकरे यांना विचारणा केली असता त्यांनी गुन्हा दाखल झाल्याचे सांगितले. मात्र,इतर तपशील व्हीआयपी बंदोबस्तात असल्याने देता येणार नाही,असे स्पष्ट केले.मारहाण करीत असतांना दोन्ही बीट मार्शल पोलिस निरीक्षक यांना शिवीगाळ करीत होते.त्यांनी स्वतःची ओळख सांगितल्यावर तू कसा जगतो हेच पाहतो.तू आतापर्यंत गडचिरोलीच्या जंगलात काम केले आहे. तुला पोलिसिंग माहितीच नाही.तुझे जगणेच कठीण करतो,अशी धमकी दिली.
(बीट मार्शल म्हणजे पोलिस खात्याचाच एक भाग आहे.ज्यात पोलीस शस्त्रसज्ज असतात.बिनतारी संदेश यंत्रणेच्या माध्यमातून काम करीत असतात.शहरात एखादी वादाची,भांडणाची किंवा हाणामारीची घटना घडल्यास,त्याची माहिती सर्वप्रथम बीट मार्शल नियंत्रण कक्षात कळवली जाते.)
- Advertisement -

