- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-महानगरपालिकेच्या कचरा संकलनासाठी वापरल्या जाणाऱ्या घंटा गाडीवर काम करत असतांना कचऱ्याचा संपूर्ण डाला अचानक अंगावर कोसळल्याने एका कंत्राटी सफाई कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज,रविवार १८ जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास नागपूरच्या सक्करदरा परिसरात घडली.सिद्धू ऊर्फ सिद्धार्थ घोडके वय ३९ वर्षे,रा.अजनी परिसर असे मृत कामगाराचे नाव असून ए.जी.एन्व्हिरो प्रा.लि.या खासगी कंपनीकडून चालवण्यात येणाऱ्या कचरा गाडीवर सफाई कामगार म्हणून कार्यरत होते.
सिद्धू घोडके हे आज रविवारी सकाळच्या सुमारास नागपूर महानगरपालिकेच्या नेहरू नगर झोन अंतर्गत बुधवार बाजार परिसरात कर्तव्यावर होते.कचरा उचलण्याचे काम सुरू असतांना गाडीच्या हायड्रोलिक प्रणालीत बिघाड झाल्याने कचऱ्याचा डाला अचानक सुटला आणि थेट सिद्धार्थ यांच्या अंगावर कोसळला. यात त्यांच्या डोक्याला जबर मार बसला आणि ते कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली दबले गेले.घटना घडताच सहकाऱ्यांनी तात्काळ त्यांना बाहेर काढून मेडिकल कॉलेजच्या ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल केले.मात्र, उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेने सफाई कामगारांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली.घटनेनंतर संतप्त कामगार,संघटना आणि मृताच्या नातेवाईकांनी सक्करदरा पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले.मृत्यूला कंपनीचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याने ए.जी.एन्व्हिरो प्रा.लि.विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा व मृताच्या कुटुंबाला तात्काळ २५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी आणि पत्नीला नोकरी देण्यात यावी, अशी ठोस मागणी आंदोलकांनी लावून धरली होती. सिद्धार्थ घोडके यांच्या पश्चात आई,पत्नी आणि दोन अल्पवयीन मुली असा परिवार आहे.कुटुंबाचा एकमेव आधारवड गेल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
- Advertisement -

