उद्रेक न्युज वृत्त
गोंदिया :- शेअर मार्केटमधून चांगला नफा मिळवून देण्याचे आमिष देत चक्क पोलिस शिपायालाच तब्बल ५० लाख ६० हजार रुपयांची चपत लावण्यात आल्याचा प्रकार डुग्गीपार येथे उघडकीस आला आहे.
आरोपी ब्लॅक रॉक इक्विटी असेट मॅनेजमेंट ग्रुप ६०२ च्या व्हॉट्सअपमधील ग्रुप ॲडमिन आदींनी इंटरनेटवरून फिर्यादी पोलिस शिपाई श्रीकांत भोजराज मेश्राम वय ३५,नेमणूक पोलीस स्टेशन डुग्गीपार यांना शेअर मार्केट संबंधात अनुभवी तज्ज्ञ असल्याचे भासवून शेअर मार्केटच्या आयपीओमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला फायदा मिळेल असे आमिष दिले.तसेच, श्रीकांत मेश्राम यांना शेअर मार्केट संबंधात बनावट लिंक पाठवून ॲप डाऊनलोड करावयास लावले. त्याद्वारे आयपीओची माहिती त्यांना देऊन वेगवेगळ्या बैंक अकाउंटवर वेगवेगळे कारण सांगून पैसे पाठविण्यास लावले.अशा प्रकारे श्रीकांत मेश्राम यांची ५० लाख ६० हजार रुपयांनी फसवणूक करण्यात आली. १८ फेब्रुवारी २०२३ ते २८ फेब्रुवारी २०२४ दरम्यान घडलेल्या या प्रकारात श्रीकांत मेश्राम यांच्या तक्रारीवरून डुग्गीपार पोलिसांनी २८ फेब्रुवारी रोजी भादंवि कलम ४२०, सहकलम ६६ (डी) माहिती तंत्रज्ञान सुधारित अधिनियम २००८ अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे.

