- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध जिल्ह्यात मागील काही दिवसांत सायबर गुन्हेगारीचा नवीनच गंभीर प्रकार समोर आला आहे.यामध्ये अनेक बँक खातेधारक अडकल्याचे स्पष्ट झाले आहे.सायबर फसवणुकीची रक्कम वळविण्यासाठी स्वतःच्या बँक खात्यांचा गैरवापर करू देणाऱ्या राज्यातील हजारो व्यक्तींवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.विशेष म्हणजे,सायबर गुन्हेगार ऑनलाईन फसवणुकीतून मिळालेली बेकायदेशीर रक्कम थेट स्वतःच्या खात्यात न घेता,पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी सर्वसामान्यांच्या बँक खात्यांचा वापर करतात.अशा प्रकारे फसवणुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या खात्यांना ‘म्यूल अकाउंट’ म्हटले जाते.या खात्यांमध्ये पैसे जमा होण्यापूर्वीच त्यातील रक्कम तातडीने इतरत्र वळवली जाते किंवा रोखीने काढली जाते.यामुळे गुन्हेगारांपर्यंत पोहोचणे यंत्रणेसाठी कठीण होते.तरी ज्या व्यक्तीच्या नावावर खाते असते,तो थेट कायद्याच्या फेऱ्यात अडकतो.त्यामुळे नागरिकांनी आपले बैंक खाते, एटीएम कार्ड,पासबुक किंवा चेकबुक कधीही कुणालाही वापरण्यासाठी देऊ नये.
- असे अडकवले जाते जाळ्यात👇
सायबर फसवणूक करणारे चोरटे अनेकांना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करतात.आमची पैश्याची उलाढाल खूप मोठी असल्याने इन्कम टॅक्स,वस्तू व सेवाकर हे आम्ही योग्य मार्गाने दाखवू शकत नाही.त्यासाठी तुमच्यासारख्या प्रामाणिक माणसाची आम्हाला गरज आहे.आम्ही तुमच्या खात्यावर काही पैसे पाठवतो, त्यातील काही रक्कम कमिशन म्हणून तुम्ही ठेवा आणि उर्वरित रक्कम आम्हाला द्या,अशी बतावणी सायबर फसवणूक चोरट्यांकडून केली जाते. तसेच,सरकारी योजनांचे भरपूर पैसे आपल्या नावावर टाकण्यात येतील असेही गाजर दाखविण्यात येते.विशेष म्हणजे,आजच्या घडीला फसवणूक करणारे अनेक एजंट तळागाळापर्यंत पोहोचले आहेत.नोकरी,पार्ट टाइम जॉब,घरबसल्या पैसे कमवा परदेशवारी मोफत अशा प्रकारची लालच दाखवून या साखळी जाळ्यामध्ये खातेदारास ओढले जाते.
- असा करा बचाव👇
एखादेवेळी अज्ञात व्यक्तीकडून फोन आल्यानंतर स्वतःची माहिती वा बँक खात्याचा पासवर्ड,ओटीपी व इतर माहिती देऊ नका.मोबाइल,व्हॉट्सॲपवर अनोळखी साइटवरून आलेले संदेश व बिनकामाचे ॲप डाउनलोड करू नका.दुसऱ्याच्या वापरासाठी व पैसे हस्तांतरित करण्यासाठी आपले स्वतःचे बँक खाते इतरांना देऊ नका.ऑनलाइन व्यवहार करतांना स्वतःचे ओटीपी,फोन नंबर,पासवर्ड दुसऱ्या व्यक्तीस देऊ नये.तुमचे खाते काही दिवस पैशाच्या व्यवहारासाठी आम्ही भाड्याने घेतो व तुम्हाला काही रक्कम देतो आम्हाला केवायसी,एटीएम ओटीपी द्या,अशी विनवणी केल्यास स्पष्टपणे नकार द्यावा.
तुम्हाला नोकरी,काम धंदा देतो,व्यवसायाला मदत करतो आणि आर्थिक मदत मिळाल्यानंतर तुमची भरभराट होईल,घरी बसून तुम्हाला पैसे कमावता येतील.काही रक्कम आम्ही जमा केल्यानंतर तुम्ही ती दुसऱ्या खात्यावर पाठवा.त्यातून कमिशन घ्या,आमचे अनेक ग्राहक श्रीमंत झालेले आहेत,त्यांची खोटी यादीही सांगितली जाते किंवा संवाद करून दिला जातो.तेही त्यांचेच माणसं असतात म्हणजेच गुन्हेगार,असे जाळे सायबर चोरटे टाकतात,यापासून सावध राहा.
- दुसऱ्याला आपले खाते वापरायला देणे कायदेशीर गुन्हा👇
आपल्या खात्यावर पैसा जमा करणारे गुन्हेगार म्हणजेच समाज विघातक कृत्य करणारे आणि यातून काळा पैसा पांढरा करणारे अनेक लोक यामध्ये गुंतलेले आहेत.त्याच्यासाठी आपल्या खात्याचा वापर करतात.यातून आपणही गुन्हेगार होतो.दुसऱ्याला आपले खाते वापरायला देणे हा कायदेशीर गुन्हा आहे. कमिशनमुळे आपल्यालाही शिक्षा होऊ शकते.
केंद्रीय गृहमंत्र्याच्या पोर्टलवर अशा तक्रारी वाढत आहेत.फसवणूक झालेल्या लोकांची माहिती गोळा करण्याचे काम सध्या वेगाने चालू आहे.वाढत्या फसवणुकीच्या तक्रारींमुळे सरकारची डोकेदुखी वाढत आहे.फसवणूक झाल्यानंतर पोलिसांत तक्रार करून व चौकशी करून एकदा गेलेला पैसा लगेच परत मिळत नाही.त्याचबरोबर,न्यायालयीन प्रक्रिया यामुळे माणसाचा वेळ वाया जातो.सदरचे खाते पूर्णपणे सील केले जाते.केवायसी,आधार कार्ड यावरसुद्धा याचे परिणाम जाणवतात. एकंदरीत पुढे कर्ज काढणे,आर्थिक सुविधा घेणे व सरकारी योजनांचा फायदा घेणे या सर्व बाबींपासून खातेदार वंचित राहतो.तसेच नावही खराब होते. शिवाय समाजामध्ये नाचक्की होते.त्यामुळे
आपले खाते आपणच वापरा,पैशाचे आमिष आणि गुन्हेगारी प्रवाहापासून दूर राहा..!
- Advertisement -

