- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
संपादक/सत्यवान रामटेके
संपादकीय :-प्राथमिक शालेय शिक्षण घेत असतांना पायात चप्पल नसायची.त्याकाळी आम्ही ज्याप्रमाणे एखादा व्यक्ती बोंग्या पायाने कसरत करण्यासाठी जातो, तश्याच प्रकारे आम्ही शाळेत जायचो.मास्तरांनी दिलेले अभ्यासाचे परिपाठ केले नाही,तर बेदम मारहाण खायचो.काहींनी शाळा शिकुन नोकरी लागते कां?, काहींनी शिकून कोणाचे भले होते म्हणून शाळेतच जाणे बंद केले,तर काहींनी शाळेत मास्तर मस्त झोडपत्यात म्हणून शाळाच सोडली.मात्र,आम्ही बोंग्या पायाने, अंगावरील फाटलेली शर्ट आणि ढीगर लागलेला पँट लावून,मास्तरांचे मार खाऊन शाळेत तग धरून राहिलो. उजाळणारा प्रत्येक दिवस आपलाच समजून पुढील पाऊले उचलली आणि त्याकाळी गुरुजींच्या हातचा खाल्लेला मार आज आम्हाला फलित करून सोडू लागला आहे.विशेष म्हणजे,विद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी बाहेर ठिकाणी जावे लागायचे.त्यावेळेस खिशात पैका नव्हता.विद्यालयात तर जायचेच होते,पहाटे पाच वाजेची तयारी झाली आणि दहा किलोमीटर अंतर पायदळी तुडवत सरळ विद्यालय घाठले होते. महाविद्यालयीन शिक्षण सुरू असतांनाच कंत्राटी कर्मचारीचा अर्ज केला.मुलाखत दिली.मुलाखत होऊन सहा महिने प्रतीक्षा यादीत नाव राहिले.दिवस उजाळला सहा महिन्यानंतर ऑफर आली, ‘you are selected’, कपड्यांची बॅग भरली.पहिलीच नियुक्ती असल्याने कार्यालयातील नियमांची जाण नव्हती.अंगात जीन्स पँट आणि टी-शर्ट घातली होती,तश्याच टी-शर्टवर तहसीलदारांपुढे उभा राहिलो.तहसीलदारांनी डोळे वटारून माझ्याकडे बघितले आणि ‘कोण आहे रे तू हिरो’ म्हणून झडती घेतली.बाजूलाच उपस्थित कार्यालयातील कंत्राटी कर्मचारी(पप्पू सर)यांनी जवळ बोलाविले आणि कार्यालयातील सर्व मंत्र सांगितल्याने तब्बल आठ वर्षे कंत्राटी कर्मचारी म्हणून सेवा बजावली.त्याचेही फळ आता मिळू लागलेत.त्यावेळेस शिकून कोणाचे भले होते?असा विचार केला असता तर आज बौद्धिक क्षमतेचे शब्दरूपी प्रकटीकरण तुमच्या पुढे मुळीच मांडलेले नसते.जीवनात बरीच कठीण प्रसंग ओढवलित, पण त्या प्रसंगावर मात केली.मागील ताटकळत राहण्यापेक्षा पुढील प्रत्येक कठीण क्षण अनुभवत राहणे यातच जीवनाचे सार दडलेले असते.कठीण प्रसंगातील काही महिन्यांपूर्वीच घडलेला एक प्रसंग तो म्हणजे बँकेतील.४० हजाराचे कर्ज घेण्यासाठी बँकांचे दररोज उंबरठे झिजवावे लागले.बँकेच्या शाखा व्यवस्थापकाशी मराठी माणसांना कर्ज नाकारता,तर इतरांना प्रतिसाद देऊन तात्काळ कर्ज मंजूर करता म्हणून भांडावे लागले. आज तिच बँक क्रेडिट कार्ड हवय कां साहेब म्हणून स्वतःच फोन करतेय.प्रसंग कुठलाही-कसाही असो, आपण आपले काम करीत राहावे.कोण काय म्हणतो, याकडे लक्ष देण्यापेक्षा चांगले कार्य करीत राहावे.चांगले कार्य हे परमेश्वरालाही लाजवत असते आणि ‘जा जगून घे तुझे हास्यमय जीवन’ असे त्याला म्हणावेच लागते.हे सत्य आहे.एखादा व्यक्ती उगाच शून्यातून विश्व निर्माण करीत नाही.त्याचे फलित एक दिवस नक्कीच मिळत असते आणि म्हणावे लागते की,सगळे दिवस सारखेच नसतात भावा; उजाळणारा प्रत्येक दिवस आपलाच समजावा..!
- Advertisement -

