उद्रक न्युज वृत्त
मुंबई :- रत्नागिरीतील पत्रकार शशिकांत शंकर वारिसे यांच्या अपघाती मृत्यूनंतर राज्यातील वातावरण तापलं आहे. सोमवारी मुंबई गोवा महामार्गावरील राजापूर येथे शशिकांत वारिसे यांच्या गाडीला धडक दिल्यानंतर ते गंभीर जखमी झाले होते. अपघातानंतर त्यांना कोल्हापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र,मंगळवारी पहाटे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.दरम्यान,अपघात नसून घातपात असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारीसे हे सोमवारी कोदवली येथून आपल्या दुचाकीने जात होते. यावेळी पंढरीनाथ आंबेरकर यांच्या थार गाडीने वारिसे यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. शशिकांत वारिसे यांनी पंढरीनाथ आंबेरकर यांच्याविरोधात बातमी प्रसिध्द केल्यानंतर त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आल्याचे म्हटले जात आहे.या प्रकरणावरुन आता राज्यातील पत्रकारांसह राजकीय नेतेही आक्रमक झाले आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून शशिकांत वारीशे यांच्या मृत्यूबाबत प्रश्न उपस्थित करुन राज्यातील कायदा सुव्यवस्थेकेड लक्ष वेधले आहे. त्यानंतर संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत या प्रकरणाबाबत बोलताना मोठा खुलासा केला आहे. मलाही तुमचा शशिकांत वारिशे करु असा धमकी देणारा फोन आल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.”मलाही आज दोनदा फोन येऊन गेला की हा मुद्दा तुम्ही उचलू नका. तुमचाही मुंबईत शशिकांत वारीशे करु अशी दोनदा फोनवरुन मला धमकी देण्यात आली. अशा धमक्यांना मी घाबरत नाही. मला घाबरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तरीही मी कोकणात जाणार आहे,” असे संजय राऊत म्हणाले.