उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :. जिल्ह्यात विविध शासकीय विकासकामे मोठ्या धुमधडाक्यात सुरू आहेत.मात्र, त्या कामांना सर्रास चोरट्या रेतीचा वापर करण्यात येत असून,यात शासनाचा लाखो रुपयांचा कर संबंधित कंत्राटदारांच्या घशात जात आहे.
सध्या मार्च एंडिंगची शासनाची विविध विकासकामे मंजूर असून,ही कामे धडाक्यात सुरू आहेत.
मात्र,या कामांना सहजरीत्या चोरट्या मार्गाने रेतीसाठा उपलब्ध होत आहे. जिल्ह्यात चोरट्या मार्गाने रेती आणणे व ठराविक ठिकाणी टाकणे.असला प्रकार गत कित्येक दिवसांपासून सुरू आहे.गरिबांना शासनामार्फत घरकुल देण्यात येते.त्यांच्या बांधकामाला रेतीसाठा उपलब्ध होत नाही.
मात्र शासनाचे कोट्यवधी रुपयांचे बांधकाम करण्यासाठी चोरट्या मार्गाने सहजरीत्या रेतीसाठा उपलब्ध होत असल्याचे वास्तव सत्य आहे. सद्य:स्थितीत सिमेंट रस्ते,शासकीय गोदाम व इतर अशी विविध बांधकामे सुरू असून,त्या बांधकामांवरील अवैध रेतीसाठ्याची चौकशी केल्यास सर्व घबाड बाहेर येण्याची शक्यता नाकारली जाऊ शकत नाही.जिल्ह्यात बऱ्याच साज्यातील तलाठी मुख्यालयी राहत नसल्याने रेती चोरीत वाढ झाल्याचे नागरिकांत बोलले जात आहे.शासकीय कामांना रेती घाटावरून दररोज रात्रीच्या सुमारास् चोरट्या मार्गाने उपसा करण्यात येत असल्याने यात शासनाचा महसूल बुडत आहे.वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांनी सुरू असलेल्या कामाची चौकशी करून त्या रेती साठ्यावर कारवाई करण्याची मागणी जिल्ह्यातील नागरिकांनी केली आहे.