- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांचे मोबाइल फोनने वाहतूक पोलिस फोटो काढतात.परंतु असे फोटो काढण्यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची मान्यताच नसल्याची माहिती खुद्द वाहतूक पोलिसांनी माहितीच्या अधिकारात दिली आहे.तरीदेखील वाहतूक पोलिस सर्रास वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांचे मोबाइलमध्ये फोटो काढत असल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
वाहन चालवितांना अनेक वाहनचालक ट्रिपल सीट वाहन चालवितात.काही वाहनचालक सिग्नल तोडून पुढे जातात तर काहीजण भरधाव वेगाने वाहन चालवितात.अनेकदा वेड्यावाकड्या पद्धतीने वाहन चालविण्यात येतात.अशा वाहनचालकांचे फोटो चौकात उभे असलेले वाहतूक पोलिस आपल्या मोबाइलमध्ये बंदिस्त करतात.त्यानंतर हे फोटो अपलोड करून संबंधित वाहनचालकांना चालान पाठविण्यात येते.याबाबत वर्धमाननगर येथील आशापुरा अपार्टमेंटमधील तिलक खंगार यांनी लकडगंज वाहतूक पोलिसांना माहितीच्या अधिकारात प्रश्न विचारला होता.यात वाहतूक नियमाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीचे वाहतूक पोलिसांद्वारे मोबाइल फोनने फोटो काढण्यास वरिष्ठ कार्यालयाद्वारे मान्यता आहे की नाही,अशी विचारणा करण्यात आली होती. त्यावर लकडगंज वाहतूक परिमंडळाच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांनी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीचे वाहतूक पोलिसांद्वारे मोबाइल फोनने फोटो काढण्यास वरिष्ठ कार्यालयाद्वारे मान्यता नसल्याची माहिती पुरविली होती.
वरिष्ठ कार्यालयाची मान्यता नसतांना वाहतूक पोलिस अद्यापही नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांचे मोबाइलद्वारे फोटो काढत असल्यामुळे तिलक खंगार यांनी पोलिस आयुक्त कार्यालयात २५ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रथम अपील दाखल केले आहे.यात वाहतूक पोलिस कोणत्या अधिकारात हे फोटो काढत आहेत, अशी विचारणा करण्यात आली आहे.परंतु अद्याप आपल्याला माहिती मिळाली नसल्याचे खंगार यांनी सांगितले.वरिष्ठ कार्यालयाद्वारे मान्यता नसतांनादेखील अद्यापही वाहतूक पोलिस वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांचे मोबाइलद्वारे फोटो काढत असल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
- Advertisement -

