उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :- जंगलात जनावरे चारण्यासाठी गेलेल्या गुराख्यावर दबा धरून बसलेल्या वाघाने अचानकरित्या हल्ला करताच गुराखी जागीच ठार झाला.सदरची घटना आज दिनांक- २० ऑक्टोंबर २०२३ रोजी मूल तालुक्यातील महाराष्ट्र वनविकास महामंडळाच्या जानाळा बीट कक्ष क्रमांक ५२३ मध्ये दुपारी ३ च्या सुमारास घडली.बंडू विठ्ठल भेंडारे वय ५८ वर्षे रा.कांतापेठ असे मृत गुराख्याचे नाव आहे.
मूल तालुक्यातील मौजा कांतापेठ येथील बंडू विठ्ठल भेंडारे नेहमीप्रमाणे गुरे चराईसाठी गावा लगतच्या जंगल परिसरात गेला होता.जंगल परिसरात दबा धरून बसलेल्या वाघाने बंडूवर दुपारच्या सुमारास अचानक हल्ला चढवला.वाघाच्या हल्ल्यामुळे दुपारच्या सुमारास वनविकास महामंडळाच्या जंगल परिसराकडून गुरे गावाच्या दिशेने पळू लागली.त्यामुळे काही नागरिकांना संशय आल्याने नागरिकांनी जंगलाच्या दिशेने धाव घेतली.तो पर्यंत बंडू भेंडारे वाघाच्या हल्ल्यात जागीच ठार झालेला होता.सदर घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी एस.बी.बोथे,वनपाल आर.जी.कुमरे,वनरक्षक यु.आर.गवई,पोलीस निरीक्षक सुमित परतेकी घटनास्थळी दाखल झाले.पंचनामा झाल्यानंतर मृत्तदेह मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे.