- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-हरभऱ्याच्या पिकाची थ्रेशर मशीनमध्ये मळणी करीत असतांना मजुराला मोबाइल फोनवर कॉल आला.तो फोनवर बोलत असतांना थ्रेशरमध्ये कापणी केलेले हरभऱ्याचे पीक ढकलत होता.अनावधानाने त्याचा हात मशीनमध्ये अडकला आणि गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना नागपूर जिल्ह्याच्या कामठी (नवीन) पोलिस ठाण्याच्या हद्दीतील लिहिगाव शिवारात घडली.साहिल सूरज देशमुख वय २५ वर्षे,रा.दिघोरी, ता.ब्रम्हपुरी, जि.चंद्रपूर असे मृताचे नाव आहे.तो थ्रेशर मशीनवर मजूर म्हणून काम करायचा. अशोक बालाजी धुडस, रा.लिहिगाव,ता.कामठी यांनी नुकतीच त्यांच्या शेतातील हरभऱ्याच्या पिकाची कापणी केली आणि बुधवारी मशीनद्वारे मळणीला सुरुवात केली. मळणीसाठी बोलावलेल्या अरविंद सांभारे यांच्या मालकीच्या थ्रेशर मशीनवर साहिल मजूर म्हणून कामाला गेला होता.मशीनमध्ये वाळलेले हरभऱ्याचे पीक हाताने ढकलत असतांना मोबाइल फोनवर त्याच्या वडिलांचा कॉल आला.तो एकीकडे फोनवर वडिलांशी बोलत होता तर दुसरीकडे एका हाताने हरभरा मशीनमध्ये ढकलत होता.अनावधानाने त्याचा एक हात चालू मशीनमध्ये गेला आणि तो आत खेचल्या गेला.यात गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला.याप्रकरणी कामठी (नवीन) पोलिसांनी साहिलचा सहकारी मनोज बिहारी दिघारे,रा.दिघोरी, ता.ब्रम्हपुरी,जि.चंद्रपूर याच्या तक्रारीवरून अकस्मात मृत्यूची नोंद केली असून,पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक संदीप भिताडे करीत आहेत.मनोजनेच सर्वप्रथम या घटनेची माहिती पोलिसांना दिली होती.साहिलचा मशीनमध्ये अडकलेला हात निघत नसल्याने पोलिसांनी गॅस कटरच्या मदतीने मशीन कापली आणि त्याला बाहेर काढले.शिवाय,लगेच कामठी शहरातील उपजिल्हा रुग्णालयात नेले.तिथे डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.साहिल घरातील कर्ता पुरुष होता.त्याच्या पश्चात म्हातारे आईवडील,पत्नी व अडीच वर्षाची मुलगी आहे.साहिल मृत्यूने कुटुंबियांवर मोठे संकट कोसळले आहे.
- Advertisement -