उद्रेक न्युज वृत्त
कोंढाळा :- देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा-वैनगंगा नदिघाटातून गेली तीन दिवसांपासून अवैधरित्या रेतीचा उपसा केला जात आहे.महसूल विभागाने मारलेली खड्डे न बुजवता रेती तस्करांनी नवीन चौथ्या रेती घाटाचा शोध लावलेला असून बंद असलेली दारे पुन्हा सुरू झाली असल्याने गावात सक्षम तलाठ्याच्या नियुक्तीची मागणी सर्वत्र जोर धरू लागली आहे.
मागील काही महिन्यांपूर्वीच रेती तस्करांनी कोंढाळा-मेंढा घाटातून ४० लाखाच्यावर रेतीचा अवैध उपसा करून शासनाच्या महसुलाची राखरांगोळी केली होती.सदर प्रकरण जिल्हाधिकारी संजय मीना यांच्याही निदर्शनास आला होता.रेती तस्करीचे प्रकरण ताजेतवाने असतांना सुद्धा गेली तीन दिवसांपासून रेती तस्करीस उधाण आले आहे.रेती तस्करांनी शक्कल लढवून मेंढा,सिंदराई व पळसगांव रेती घाटांवर डल्ला न मारता;सरळ नवीन मार्ग शोधला आहे.जेणेकरून कुणालाही भनक लागू नये.रेती तस्करांनी मेंढा नदिघाटाकडे जाणाऱ्या मार्गाचा वापर केला आहे.
रेतीचा अवैध उपसा करण्याकरिता रेती तस्करांनी मेंढा मार्गावरील फॅक्टरीच्या थोडा समोर गेल्यास डाव्या बाजूस असलेल्या पांदण रस्त्यावरून नवीन मार्ग शोधून काढला आहे.हल्ली रेतीचे भाव वधारले असल्याने रेती तस्करांची चांदीच-चांदी पहावयास मिळत आहे.गावात तलाठी वास्तव्यास राहत नसल्याने रेती तस्कर याच संधीचे सोने करवून घेतांना दिसून येत आहेत.मागील कालावधीत कोंढाळा-मेंढा घाटातील लाखो रुपयांच्या रेती चोरी प्रकरणी एकाही रेती तस्करांवर कारवाई झाली नसल्याने पूर्वीच लाखो रुपयांचा महसूल बुडूनही कुणाला ‘ना सुतक ना बारसा’असे दिसून येत आहे.अवैध रेतीच्या उपस्यावर आळा घालण्यास गावातील तलाठी सक्षम नसल्याचे संबंधित प्रकारावरून दिसून येत असल्याने सक्षम तलाठ्याची गावात मागणी केली जात आहे.
शासनाचा मोठ्या प्रमाणावर महसुल बुडीत होत असल्याने जिल्हाधिकारी संजय मीना यांना परत ही बाब निदर्शनास आणून देने आवश्यक आहे.अन्यथा सुरू असलेली दारे बंद होणार नाही.