देसाईगंज :- तालुक्यातील कोंढाळा-मेंढा वैनगंगा नदी रेती घाटातून ४० लाख रुपयांच्या वर रेती तस्करीचे प्रकरण उघडकीस येताच देसाईगंज महसूल विभाग खळबळून जागे होऊन तालुक्यातील रेती घाटांवर खड्डे मारून व पाळत ठेऊन रेती तस्करीवर काही काळ आळा घातला आहे.मात्र हल्ली रेती तस्करांनी खड्डे न बुजवता पर्यायी मार्ग शोधून नवीन रेती घाटांकडे आपला कल वळविला असल्याने पुन्हा एकदा शासनास लाखोंच्यावर महसुलास चुना लागणार की काय?असा सवाल उपस्थित केला जातो आहे.
कोंढाळा-मेंढा रेती घाटावर खड्डे मारले असल्याने रेती तस्करांनी कोंढाळा-पळसगांव वैनगंगा नदी रेती घाटातील अवैधरित्या रेती चोरी करण्याचा सपाटा लावला आहे.रेती तस्करांनी शक्कल लढवून घाटातील मुख्य मार्गाचा अवलंब करून उत्तरेस दोन किलोमीटर अंतरावर मार्ग शोधून रेती तस्करीचा खेळ सुरू झाले असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.पहाटे सकाळच्या सुमारास व रात्रो १० वाजेपासून ते रात्रभर रेती तस्करांची मैफिल जमून कधी साई मंदिराकडील पांदण रस्त्यावरून ते खडकी धोडी नाल्यापर्यंत तर कधी चिकन मार्केट जवळून तर कधी गावाबाहेरील रस्त्यावरून रेती व त्यासोबतच अवैधरित्या मुरूमाचे ट्रॅक्टर धावू लागले आहेत.
तस्करांवर कुणाचे धाक ना दरारा असल्याने राजरोसपणे रेतीची साठवणूक करून रेतीचे भाव वधारताच हळूच डोके वर काढून गावात व देसाईगंज येथे अंधाराचा व कार्यालयीन सुट्टीचे दिवस पाहून विक्री केली जात आहे.गावामध्ये एका ब्रास साठी ३ हजार रुपये तर देसाईगंज साठी ५ हजार रुपये प्रति ब्रास किंमत ठरली असल्याने यांवर आळा घालणे गरजेचे आहे.अन्यथा रेती चोरीचे प्रमाण वाढून मोठ्या प्रमाणावर शासनास चुना लागल्याशिवाय राहणार नाही.