उद्रेक न्युज वृत्त
गोंदिया :-सध्या धानाचे भाव वाढले आहेत.११ जुलै रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीत श्रीराम तीन हजार ते तीन हजार १०० रुपये तसेच मोहरा तीन हजार ४०० ते तीन हजार ५०० रुपये या भावात विकला गेला.
गोंदिया जिल्ह्यात प्रामुख्याने धानाचे पीक घेतले जाते. याच धान पिकावर या जिल्ह्याची संपूर्ण अर्थव्यवस्था अवलंबून आहे.जिल्ह्यातील एक लाख ९६ हजार ८३२ हेक्टरवर खरिपाची पेरणी होते.यावर्षी अगदी सुरुवातीपासूनच धान पिकास योग्य वातावरण नव्हते. तरी विविध साधनांचा उपयोग करून शेतकऱ्यांनी धानाचे पीक लावायला सुरुवात केली.मागील वर्षी उतारी दर एकरी १५ ते २० क्विंटल होते.धान हातात आल्यानंतर हंगामावर झालेल्या खर्चाची परतफेड करण्यासाठी तसेच कौटुंबिक खर्चासाठी शेतकऱ्यांनी धानाची विक्री केली.विक्रीची ही प्रक्रिया साधारणतः मार्च महिन्यापर्यंत चालते.अपवादात्मक स्थितीत काही सधन शेतकरी असतील त्याच शेतकऱ्यांकडे आता धान शिल्लक असतील; पण बहुतांश शेतकऱ्यांकडे आता धान शिल्लक नाहीत,ही वस्तुस्थिती आहे. गोंदिया गंजात ११ जुलै रोजी श्रीराम तीन हजार ते तीन हजार १०० रुपये तर मोहरा तीन हजार ४०० ते तीन हजार ५०० रुपये या भावात विकला गेला असल्याची माहिती आहे.
धान विक्रीचा हंगाम हा साधारणतः ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी,फेब्रुवारी व मार्च महि- न्यापर्यंत चालतो.या कालावधीतच बहुतांश शेतकरी धानाची विक्री करतात.शेतकऱ्यांनी विकलेले हे धान मिल मालक आणि व्यापारी खरेदी करतात.
व्यापारी धान साठवणूक करून ठेवतात आणि नंतर दर वाढले की,साठवणूक केलेले धान विक्रीसाठी काढतात.धानाचे भाव वाढले तर वाढलेल्या या भावाचा फायदा शेतकऱ्यांना होत नाही.तो फायदा व्यापाऱ्यांनाच होतो.यातून ते मालामाल होतात.

