उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज :- शहरातील बुरूड कामगारांना गेली दोन वर्षांपासून जिल्ह्यात बांबूचा पुरवठा केला जात नसल्याने बाहेर ठिकाणाहून बांबूसाठी भटकंती करावी लागत आहे.अशातच बुरूड कामगारांना दरवर्षी कार्ड नूतनीकरण करावे लागत असल्याने बुरूड बांधवांची डोकेदुखी वाढून कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे.कामगारांवर उपासमारीची वेळ येऊनही जिल्ह्यात वनविभाग बांबू पुरवठा करण्यास असमार्थता दर्शवित असल्याने बुरूड बांधवांनी वनविभागाप्रति रोष प्रकट केला आहे.
बुरूड बांधवांना जिल्ह्यात बांबूचा पुरवठा केला जात नसल्याने लगतच्या गोंदिया जिल्ह्यातील नवेगावबांध येथून बांबू आणावे लागत आहे.अशातच वनविभागाच्या बांबूची उचल करण्याकरिता कार्ड नूतनीकरणाच्या जाचक अटींमुळे बुरूड कामगारांना त्रास सहन करावा लागत आहे.गडचिरोली जिल्ह्यात बांबूची उचल करण्याकरिता दरवर्षी कार्डचे नूतनीकरण करावे लागत असते.मात्र बाकीच्या जिल्हात बांबूची उचल करण्याकरिता पाच वर्षातून एकदाच कार्ड नूतनीकरण करण्यात येते.दरवर्षी कार्डचे नूतनीकणासाठी परत पुन्हा तीच कागदपत्रे गोळा करून ऑनलाईन करावे लागत आहे.पूर्वीच संपूर्ण कागदपत्रे दिलेली असूनही जुने कार्ड घेणे व नवीन कार्ड देणे अपेक्षित आहे.मात्र जिल्ह्यात बुरूड कामगारांना नाहक त्रास देण्याचे काम सुरू असल्याचे दिसून येत आहे.हस्तकलेचे प्रमाणपत्रमिळवीण्यासाठी संबंधित विभागास १०० रुपये द्यावे लागत असल्याचे बुरूड कामगारांनी सांगितले.बाहेर ठिकाणाहून ऑनलाईन केल्यास १०० रुपये तसेच बाहेर जिल्ह्यातून बांबू आणण्याकरिता लागणारा इतर खर्च वेगळा लागत असल्याने बुरूड कामगारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
सदर बुरूड कामगारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असल्याने देसाईगंज युवक काँग्रेस शहराध्यक्ष पिंकुभाऊ बावणे व शहरातील बुरूड बांधवांनी आज १७ मार्च २०२३ रोजी दुपारच्या सुमारास वन विभाग वडसाचे उपवसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल यांच्याशी चर्चा केली.चर्चे दरम्यान लवकरात-लवकर बुरूड कामगारांच्या समस्यांचे निराकरण करण्यात येणार असल्याचे सालविठ्ठल यांनी सांगितले आहे.