उद्रेक न्युज वृत्त
बीड : चोरीस गेलेल्या मौल्यवान वस्तू दागिने परत मिळण्याची शाश्वती नसते.चोराचा छडा लावून मुद्देमाल हस्तगत करताना पोलिसांची दमछक होतांना दिसून येते.मात्र बीड शहरातील एका तक्रारदाराला चोरट्यांनी सुखद धक्का दिला आहे.कपाटातून लांबविलेले साडेचार तोळे दागिने दहा दिवसांनी दारापुढे आणून ठेवले.
चोराला उपरती आल्याच्या प्रकाराने तक्रारदारासह पोलिसही अचंबित झाले आहेत.सविता प्रल्हाद काशीद (४३, रा. पाडळसिंगी ता.गेवराई) या मामेबहिणीच्या लग्नकार्यासाठी बीडला नातेवाइकांकडे गेल्या होत्या.त्यांची आतेबहीण सुनीता म्हेत्रेही या मुक्कामी होत्या.
२७ जानेवारी रोजी दोघींचे दोन गंठण चोरट्यांनी कपाटातून लंपास केले.३० जानेवारी रोजी शहर ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता.पोलीस निरीक्षक रवी सानप, उपनिरीक्षक रमेश गायकवाड, अंमलदार मनोज परजणे,आशपाक सय्यद, अविनाश सानप यांनी घटनास्थळी भेट दिली व श्वानपथक पाचारण करून चोरीचा छडा लावण्याचा प्रयत्न केला.मात्र चोरीचा छडा न लागताच अज्ञात चोरट्यांनी १० दिवसांनी ५ फेब्रुवारी रोजी चोराने दारापुढे दोन मिनी गंठण आणून ठेवले असल्याने सर्वत्र चर्चेचा विषय ठरू लागला आहे.