- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
उमरेड(नागपूर) :-धनादेश बाऊन्सप्रकरणी सहा
महिन्यांचा साधा कारावास व १५ लाख ३० हजार रुपये दंड,अशा स्वरूपाची शिक्षा न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग उमरेड न्यायालयाने सुनावली आहे.अब्दुल अकील अब्दुल शमी पटेल वय ४० वर्षे,रा.परसोडी उमरेड,असे आरोपीचे नाव आहे.फिर्यादी पक्षकाराचे नाव विकास जागेश्वर सिर्सीकर वय ५० वर्षे,रा. इतवारी पेठ उमरेड असून हा संक्षिप्त फौजदारी खटला २९ मार्च २००७ ला दाखल केला गेला.
खटल्याची नोंदणी २९ मार्च २००७ ला झाल्यानंतर तब्बल १७ वर्षे १० महिने ६ दिवस हा खटला चालला. न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग उमरेड तथा पीठासीन अधिकारी रा.भा.डोळे यांनी हा न्यायनिर्णय ४ फेब्रुवारी २०२५ ला खुल्या न्यायालयात अधिघोषित केला.
फिर्यादी विकास सिर्सीकर हे शेती आणि वीटभट्टीचा व्यवसाय करीत होते.त्यांचे आणि आरोपी अब्दुल अकील अब्दुल शमी पटेल यांच्याशी चांगले संबंध होते.या कारणाने आरोपीला त्याच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारात पैशांची गरज भासली.पटेल यांनी विकास सिर्सीकर यांच्याकडे एक महिन्याच्या कालावधीसाठी रकमेची मागणी केली.आरोपीच्या अडचणीचा विचार करून सिर्सीकर यांनी पटेल याला ७ लाख ६५ हजार रुपये उसणे दिले.महिना झाला.एकीकडे रकमेची मागणी वारंवार करूनही उद्या देतो,दोन दिवसांत देतो, असे म्हणत आरोपी टाळाटाळ करीत होता. सरतेशेवटी आरोपीने २८ डिसेंबर २००६ रोजी नागपूर येथील एका बँकेचा धनादेश दिला.१७ जानेवारी २००७ रोजी स्थानिक बँकेच्या माध्यमातून धनादेश वटविण्यासाठी टाकला गेला.अपर्याप्त रक्कम असल्याच्या कारणावरून अनादरीत(बाऊन्स) झाला.पुन्हा धनादेश टाकण्याची विनंती आरोपीने केली.२४ फेब्रुवारी २००७ ला पुन्हा धनादेश बाऊन्स झाला. आरोपीला नोटीस पाठविल्यानंतर त्याने फिर्यादीस खोटे उत्तर दिले.अखेरीस १३८ कलमान्वये याप्रकरणी फिर्याद दाखल करण्यात आली.फिर्यादी पक्षाच्या वतीने ॲड.एल.आर.मांडवकर, तर आरोपी पक्षाच्या वतीने ॲड.अशोक झाडे यांनी काम पाहिले.न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग उमरेड यांच्या न्यायालयात खटला दाखल झाला.त्यानंतर आरोपाचा आशय व आरोपीचे म्हणणे,मुद्दे व निष्कर्ष,कारणमिमांसा, फिर्यादी पक्षाचा पुरावा,आरोपी बचाव पक्षाचा पुरावा, युक्तिवाद,साक्षीदार,असा संपूर्ण घटनाक्रम या खटल्याचा चालला.२ मार्च २०२० पासून कोरोनामुळे प्रकरण प्रलंबित होते.उच्च न्यायालयाच्या परिपत्रकान्वये २ ऑगस्ट २०२१ पासून न्यायालयीन कामकाज पूर्ववत सुरू झाले.फौजदारी प्रक्रिया संहितेचे कलम २५५ (२) अन्वये आरोपी अब्दुल अकील अब्दुल शमी पटेल यास कलम १३८ अन्वये आरोपात दोषी ठरविण्यात आले.
आरोपी अब्दुल अकील अब्दुल शमी पटेल या धनादेश बाऊन्स प्रकरणात सहा महिन्यांचा साधा कारावास व १५ लाख ३० हजार रुपये अशी शिक्षा सुनावण्यात आली.फौजदारी संहितेचे कलम ३५७ (३) अन्वये फिर्यादी विकास सिर्सीकर यांना ही रक्कम अदा करण्यात यावी,असे खटल्याच्या निकालात म्हटले आहे.आरोपीने ही दंडाची रक्कम अदा न केल्यास आरोपीला आणखी तीन महिन्यांचा साध्या कारावासाची शिक्षा भोगावी लागेल,असेही निकालपत्रात नमूद आहे.
- Advertisement -

