उद्रेक न्युज वृत्त
गोंदिया :- अर्जुनी मोरगाव स्थानिक नगरपंचायत क्षेत्रात तयार झालेल्या घरकूल बांधकामाचे अनेक किस्से उजेडात येत आहेत.पंतप्रधान आवास योजना व रमाई घरकूल योजनेत नियमबाह्य कामे झाल्याचा आरोप केला जात आहे.अभियंत्याला हाताशी धरून लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ देण्यात आला.याद्वारे कंत्राटी अभियंते मालामाल झाले आहेत.विशेष यंत्रणेद्वारे या घरकूल घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी विनायक मडावी यांनी केली आहे.
ज्यांना राहायला घर नाही.घरकूल बांधकामासाठी स्वतःची जागा असूनही अशा अनेक लाभार्थ्यांना घरकूल देण्यात आले नाही.दुसरीकडे ज्यांच्याकडे जागा आहे अशा एकाच कुटुंबातील कुठे २ तर कुठे ३ लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला.यात काही तर अविवाहितांचाही समावेश असल्याचा आरोप आहे.ज्यांच्या घराचे बांधकाम दोन ते तीन वर्षांपूर्वी झाले आहे.अशांना घरकूल मंजूर करून नव्याने एकही बांधकाम न करता लाभ देण्यात आला.ज्या जागेवर घरकूल मंजूर झाले प्रत्यक्षात त्याठिकाणी बांधकाम न करता अतिक्रमणाच्या जागेवर बांधकाम झाले आहे.मौका चौकशी न करता अशा लाभार्थ्यांना बिल सुद्धा देण्यात आले आहे.गुरांच्या गोठ्याला घरकूल दर्शवून अनुदान उकळल्याचेही बोलले जाते.जुने घर दाखवून लाभ घेणे,बांधकाम न करताच अनुदानाची उचल, ग्रामपंचायत असताना घरकुलाचा लाभ मिळाल्यानंतर पुन्हा नवीन घरकूल योजनेचा लाभ घेणे अशा पद्धतीने घरकूल योजनेत घोळ असल्याचा आरोप करण्यात आला आहे.