- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
कोंढाळा(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या अनेक गावांमध्ये कृषि विभागाच्या वतीने नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प राबवित येत असून यामध्ये विविध योजना व कार्यक्रम निर्देशित करण्यात आले आहेत.सदर प्रकल्पांतर्गत देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा गावाची भात पिकाकरिता महिला शेतीशाळेमध्ये निवड झाल्याने नुकताच भात शेतीशाळेचा चौथा वर्ग घेण्यात आला.
शेतीशाळा म्हणजे शेतकऱ्यांना प्रत्यक्ष त्यांच्याच शेतात, पिकांच्या अभ्यासाद्वारे आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उत्पादन वाढवण्यासाठी आणि पिकांवरील समस्यांवर स्थानिक पातळीवर तोडगा काढण्यासाठी प्रशिक्षित करणे होय.सदर शेतीशाळेला शेतीशाळा प्रवर्तक भूषण देशमुख यांनी पीक परिस्थितीनुसार भात पिकातील प्रमुख कीड व रोग ओळख करून गावातील शेतकरी अरुण दुपारे यांच्या शेतावर भेट देऊन प्रात्यक्षिकाद्वारे माहिती दिली व महिलांचे पाच गट तयार करून भात पिकाचे पीक परिसंस्था निरीक्षणे घेऊन प्रत्येक गटामार्फत चित्रीकरण व सादरीकरण करण्यात आले.तर कोंढाळाचे सहाय्यक कृषि अधिकारी आर.ए. तुळसकर यांनी भात पिकाचे एकात्मिक व्यवस्थापन, कृषि विभागाच्या विविध योजना,प्रधानमंत्री सूक्ष्मअन्न प्रक्रिया उद्योग(PMFME),फळबाग लागवड,फेरोमेन सापळा प्रात्यक्षिक तसेच शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असणाऱ्या महाविस्तार एआय(AI) ॲपची प्रत्यक्षिकाद्वारे सविस्तर माहिती दिली.
शेतकऱ्यांना प्रामुख्याने शेतकरी क्रमांक(Farmer ID)तयार करणे व पीएम किसान योजनेविषयी सविस्तर माहिती दिली.तसेच कार्यालयात स्वतंत्र पीएम किसान डेस्क तयार केला असून अडचणी असल्यास देसाईगंज तालुका कृषी अधिकारी कार्यालयास संपर्क साधावा, तसेच कृषि विभागाच्या विविध योजनांचे लाभ घेण्याचे आवाहन तालुका कृषि अधिकारी रुपेश कांबळे यांनी शेतकऱ्यांना केले आहे.सदर कार्यक्रमास कोंढाळा ग्रामपंचायतीच्या सरपंचा अपर्णा राऊत यांनी उपस्थिती दर्शवून शेतीशाळा हा उपक्रम अत्यंत महत्वाचा असून दर पंधरा दिवसांनी शेतीशाळेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीविषयक मार्गदर्शन व कृषि योजनांची माहिती मिळत असते. त्यामुळे दरवर्षी आपल्या गावात शेतीशाळेचे नियोजन करावे,अशी विनंती तालुका कृषि अधिकारी यांना केली व शेतकऱ्यांना या माध्यमातून आपले शेतीविषयक अडचणीचे समाधान करून घेण्याचे आवाहन महिला शेतकऱ्यांना केले.
- Advertisement -

