उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :- शासकीय किंवा खासगी दंत रुग्णालयात दंतोपचारासोबत लवकरच ‘हेअर ट्रान्सप्लांट’ची सुविधाही उपलब्ध होणार आहे.’डेंटल कौन्सिल ऑफ इंडिया’ने (डीसीआय) एमडीएस ओरल सर्जरी’ अभ्यासक्रमात ‘हेअर ट्रान्सप्लांट’ अभ्यासक्रमाचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे.याचा फायदा डॉक्टरांसह रुग्णांनाही होणार आहे.
अकाली टक्कल पडल्यामुळे आजची युवा पिढी त्रस्त आहे.टक्कल पडले की वय जास्त दिसते, आत्मविश्वास कमी होतो.आधीच्या काळात चाळीशीनंतर येणारे टक्कल आजच्या धकाधकीच्या स्पर्धात्मक जीवनात तणाव,भेसळयुक्त जेवण,प्रदूषण, अयोग्य जीवनशैलीमुळे विशीतच पडायला लागले आहे.टक्कल पडण्याच्या वाढत्या समस्येने नागपुरात बोगस ‘हेअर ट्रान्सप्लांट’चे रॅकेट सुरू आहे.या पार्श्वभूमीवर ‘डीसीआय’ने घेतलेला हा निर्णय किती फायद्याचा ठरणार; हे आगामी काळात दिसून येणार आहे.
केस प्रत्यारोपणासाठी भासणार सोयींची गरज
प्रशिक्षण प्राप्त ‘ओरल’ व ‘मॅक्सिलोफेशियल तज्ज्ञाच्या हॉस्पिटल किंवा क्लिनिकमध्ये शस्त्रक्रियागृहासह पोस्ट ऑपरेटिव्ह रिकव्हरी रूम आवश्यक असणार आहे.याशिवाय औषधांचा साठा, ‘बॉयल्स मशिन’, ‘इंट्यूबेशन सेट’, ‘ॲम्बू बॅगसह आपत्कालीन परिस्थितीवर देखरेख ठेवण्यासह ती हाताळण्याची सुविधा असणे गरजेचे असणार आहे.