- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गोंदिया :-अवैधरित्या रेतीची चोरटी वाहतूक करतांना भरधाव वेगात असलेला टिप्पर उलटून चालक जागीच ठार झाला तर सहकारी गंभीर जखमी झाल्याची घटना गोंदिया तालुक्याच्या ग्राम इर्री येथील निर्वाण बारसमोर काल, सोमवारी सकाळच्या सुमारास घडली.अनमोल महादेव वट्टी वय २५ वर्षे, रा.मेहंदीपूर, ता.तिरोडा असे मृत चालकाचे,तर खुशाल चंदनलाल चौधरी वय १८ वर्षे, रा.मुंडीपार-नवरगाव असे जखमी वाहकाचे नाव आहे.
अवैध रेतीची वाहतूक करतांना वाहतुकीचे साधन कुणालाही सापडू नये,यासाठी टिप्पर वा ट्रॅक्टर भरधाव वेगाने पळविली जातात.वाहन वेगात असतांना नियंत्रित करणे अवघड असते.अश्याच प्रकारे चालक अनमोल वट्टी हा टिप्पर क्रमांक- एमएच ३५ एजे १६१० भरधाव वेगात चालवित होता.त्यातच सकाळच्या सुमारास ग्राम इर्री येथील निर्वाण बारसमोर चालकाला रस्त्यावरील खड्डा दिसला. खड्ड्यातून वाहन जाऊ नये आणि वाहन असंतुलित होऊ नये,यासाठी चालकाने टिप्परला ब्रेक न लावता खड्डा वाचविण्यासाठी रस्त्याच्या कडेला नेला.परंतु टिप्पर वेगात असल्याने चालकाचे टिप्परवरील नियंत्रण सुटले व टिप्पर उलटला.यात अनमोल वट्टी घटनास्थळीच ठार झाला,तर वाहक खुशाल चौधरी गंभीर जखमी झाला.त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.रेतीघाट बंद असतांनाही रेतीचा उपसा करून मोठ्या प्रमाणात रेतीची अवैध वाहतूक होत आहे.ही अवैध रेती लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी भरधाव वेगात टिपर हाकून मोठी रक्कम कमविणारे रेतीमाफिये चालक व वाहकांना नेहमीच मृत्यूशी खेळायला भाग पाडतात. ग्राम मोरवाही येथील पोलिस पाटील विनोद ठाकूर यांच्या तक्रारीवरून अपघातातील चालक मृत अनमोल वट्टी व टिप्पर मालक परवेज पठाण वय ४० वर्षे,रा.तिरोडा या दोघांवर भारतीय न्याय संहिता कलम २८१,१०६ (१), १२५ (ए),३०३,(२), ४९ सहकलम १८४ मोटार वाहन कायद्यान्वये पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक राहूल खारकर करीत आहेत.
- Advertisement -