उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :- ईडीचे अधिकारी बनून झवेरी बुलीयन बाजारातील व्यावसायिकाकडील सुमारे चार कोटींच्या ऐवजाची लुट करण्यात आल्याची घटनेनंतर आता सेल्स टॅक्स अधिकारी बनून दोघांनी एका व्यक्तीजवळील ३२ लाखांची रोख रक्कम लुटल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली.
अवघ्या काही तांसात लोकम्यान टिळक मार्ग पोलिसांनी गुन्ह्याची उकल करत संजयसिंग करचोली (३३) आणि रजिया अजीज शेख (३६) या दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.दोघेही सुरक्षारक्षक असल्याचे तपासात समोर आले आहे.शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास जठाराम हे एका अंगाडियाकडून व्यवहाराचे ३२ लाख रुपये घेऊन पायी आपल्या कार्यालयात जात होते. येथील आदर्श हॉटेलजवळ एका महिला आणि एका पुरुषाने त्यांना अडवले. त्यांनी सेल्स टॅक्स अधिकारी असल्याचे भासवून जठाराम यांच्याजवळील ३२ लाख रुपयांची रोख रक्कम आणि त्यांच्याजवळील मोबाईल फोन ताब्यात घेत तेथून काढता पाय घेतला. घडलेल्या प्रकाराने घाबरलेल्या जठाराम यांनी कार्यालयात येत मालकांना याबाबत सांगितले. त्यानंतर त्यांनी लोकमान्य टिळक नगर पोलीस ठाणे गाठून तक्रार केली.
लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांनी गुन्ह्याची गांभिर्याने दखल घेत दोन अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करुन गुन्ह्याचा तपास सुरु केला.पोलिसांनी परिसरातील सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने आरोपींनी गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकीची माहिती मिळविली. त्याआधारे मंगलदास मार्केट परिसरातून आरोपी संजयसिंग याला ताब्यात घेतले.सुरक्षा रक्षक सुपरवायझर असलेल्या संजयसिंग याने त्याच्यासोबत सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या रजिया हिच्या मदतीने हा गुन्हा केल्याचे चौकशीत समोर आल्याने पोलिसांनी तिलाही ताब्यात घेत अटक केली आहे. न्यायालयाने दोन्ही आरोपींना १ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.