उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :- एखादा इसम कधी कुणाची फसवणूक करणार हे सांगता येत नसल्याने नागरिकांनो सावधान..! असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.कारण मागील काही महिन्यांपूर्वी गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा गावातील दोन व्यक्तींना; बाहेरील अज्ञात इसम येऊन स्वस्तात डिझेल देणार म्हणून त्यांचीच दुचाकी व पैसा गोळा करून पोबारा केल्याची घटना घडली व त्या चोरट्याचा अजून पर्यंत थांगपत्ताच लागलेला नाही.अशातच महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूरात अजब-गजब कारनामा घडल्याची घटना उघडकीस आली आहे.
नागपूरच्या एका तरुणीने महागडी दुचाकी विक्रीची ऑनलाइन जाहिरात OLX वर पोस्ट केली.जाहिरात पोस्ट केल्या नंतर एका अज्ञात तरुणाने सदरची गाडी पाहण्यासाठी तरुणीस आग्रह केला.त्यानुसार गाडी पाहण्यासाठी अज्ञात तरुणाने; तरुणीस नागपूरच्या केडीके कॉलेज रस्त्यावर बोलावले व दुचाकीची ट्रायल घेतो असे सांगितले.मात्र बराच वेळ होऊनही दुचाकीची ट्रायल घेणारा अज्ञात तरुण परतलाच नाही.त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे तरुणीस लक्षात आले.त्यानुसार फसवणूक आणि चोरीची तक्रार नागपूरच्या नंदनवन पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.सदर तरुणीचे नाव पारुल सोनी असे आहे.सध्या स्थितीत पारूलला महागडी गाडी विक्रीची जाहिरात OLX वर टाकणे महागात पडले आहे.ट्रायलच्या नावावर वाहन चोरीच्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी अज्ञात तरुणावर गुन्हा दाखल करीत आरोपीचा शोध सुरू केला आहे.

