- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-सार्वजनिक बांधकाम विभागात (पीडब्ल्यूडी) बिल काढण्यासाठी कर्मचारी पैसे घेत असल्याचा एक व्हिडीओ समोर आला असून,त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागात खळबळ उडाली आहे.यात एक कर्मचारी उघडपणे पैसे घेतांना दिसत आहे.या प्रकरणाची तक्रार मुख्य अभियंत्याकडे करण्यात आली असून,आतापर्यंत पोलिसांत मात्र तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.या व्हिडीओच्या आधारे ठोस कारवाई केली जाते की थातूरमातूर कारवाई करून प्रकरण दडपले जाते,याकडे लक्ष लागले आहे.
सुशिक्षित बेरोजगार अभियंता (कंत्राटदार) विजय गभणे यांनी हा व्हिडीओ तयार केला आहे.गभणे यांनी संयुक्त उपक्रमांतर्गत कामठी येथील उपनिबंधक कार्यालयाचे बांधकाम केले होते.त्याची निविदा २०१८-१९ मध्ये प्रसिद्ध झाली.काम २०२४ मध्ये पूर्ण झाले.या कामात अतिरिक्त दहा लाख रुपयांचे काम करण्यात आले.या कामाच्या देयकासाठी ते मुख्य अभियंता कार्यालयाच्या चकरा मारत होते.परंतु कार्यालयातील कारकून आणि वैयक्तिक सहाय्यक मंजुरीसाठी पैशाची मागणी करीत होते.अशा परिस्थितीत गभणे यांनी पोल खोलण्यासाठी स्टिंग ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला.२७ जानेवारी रोजी त्यांनी पैशाची मागणी करणाऱ्या लिपिकाला गाठले. त्याच्या मागणीनुसार रोख २५ हजार रुपये त्याला दिले.सोबतच गभणे यांनी पैसे देतांनाचा व्हिडीओ बनविला.व्हिडीओमध्ये,कर्मचारी स्पष्टपणे म्हणत आहे की,निविदा लिपिक आणि मुख्य साहेबांना बिलाच्या मंजुरीसाठी पैसे द्यावे लागतील.यानंतर १० फेब्रुवारी रोजी गभणे यांनी मुख्य अभियंता यांची भेट घेत त्यांच्याकडे संबंधित व्हिडीओ सोपविला व अधिकृतपणे तक्रार केली.या प्रकरणात कठोर कारवाईची मागणी केली.आता हा संबंधित व्हिडिओ बऱ्याच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचला आहे.लिपिकाला त्याच्या कामाच्या ठिकाणी पैसे घेतांना पैसे पाहून संपूर्ण विभागात एक खळबळ उडाली आहे.गभणे यांनी आपल्या तक्रारीत एसीबीने या प्रकाराची दखल घेण्याची विनंती केली आहे.
पीडब्ल्यूडीमध्ये(सार्वजनिक बांधकाम विभाग) कंत्राटदारांना आपले बिल काढण्यासाठी प्रत्येक टेबलवर पैसे मोजावे लागतात.शिपायापासून लिपिकापर्यंत अन् कनिष्ठ अभियंत्यापासून तर वरिष्ठांपर्यंत सर्वांच्या नावाने वेगवेगळे पैसे उकळले जातात,असे कंत्राटदार व बेरोजगार अभियंत्यांचे म्हणणे आहे.याला विरोध केला तर तुम्हाला एकतर सिस्टिमच्या बाहेर काढले जाते किंवा तुमच्या देयकात त्रुटी काढल्या जातात व बिल अडविले जाते.यामुळे या विभागातील पाळेमुळे खोदून काढण्याची गरज कंत्राटदार व सुशिक्षित बेरोजगार अभियंते खासगीत बोलतांना आपल्या भावना व्यक्त करतात.
- Advertisement -

