- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-सायबर चोरटे म्हणजेच ऑनलाईन फसवणूक करणारे अज्ञात चोरटे ‘या ना त्या’ मार्गाने सर्वसामान्य नागरिकांना जाळ्यात अडकवून फसवणूक करतात. अश्याच प्रकारे सायबर भामट्यांनी वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करून नागपूर शहरातील दोन वृद्धांना तब्बल साडे सहा लाख रुपयांचा गंडा घातला.
- फेसबुक लिंकने केला घात👇
बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून सेवानिवृत्त झालेले ज्ञानेश्वर बापू ढोबळे वय ७० वर्षे,रा.रामेश्वरी रिंग रोड, कुकडे ले-आउट,नागपूर हे घरी मोबाईलवर सोशल मीडियाचे फेसबुक पाहत असतांनाच त्यांना बँक ऑफ इंडियाच्या निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी ओळखपत्राची सुविधा देणारी लिंक दिसली.ही लिंक आपल्या बँकेशी संबंधित असल्याचे समजून त्यांनी त्यावर क्लिक केले.लिंकवर क्लिक करताच सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइलचा ताबा मिळविला.त्यानंतर मोबाइलमधील बँकिंग तसेच यूपीआय सेवांवर नियंत्रण मिळवून त्यांच्या खात्यातून दोन लाख रुपयांचे अनधिकृत व्यवहार करण्यात आले. खात्यातून पैसे कमी झाल्याचे लक्षात येताच ढोबळे यांनी अजनी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनीही भारतीय न्याय संहिता व माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
- ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती👇
नागपूरच्या जयप्रकाशनगर,खामला परिसरातील विभुराम अपार्टमेंटमधील ६५ वर्षीय रहिवासी सुरेश भास्करराव पोहनकर यांना काही दिवसांपूर्वी एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला.आपण मुंबई पोलिस मुख्यालयातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक ‘आकाश शर्मा’ असल्याचे सांगत त्याने पोहनकर यांच्या ओळखपत्रांचा गैरवापर करून एचडीएफसी बँकेत खाते उघडण्यात आल्याचे सांगितले. या खात्याचा वापर दहशतवादी कारवायांसाठी निधी पुरविण्यासाठी झाल्याचे सांगून त्यांना घाबरविण्यात आले.त्यानंतर अन्य भामट्यांनी एनआयए अधिकारी असल्याचे भासवत व्हॉट्सॲपवर संपर्क साधला.अटक वॉरंटची भीती दाखवून पोहनकर यांना मानसिक दबावाखाली ठेवण्यात आले.खात्याची चौकशी आणि निर्दोषत्व सिद्ध करण्याच्या नावाखाली आरोपींनी त्यांच्याकडून साडे चार लाख रुपये आपल्या खात्यांमध्ये ट्रान्सफर करून घेतले.फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पोहनकर यांनी पोलिसांकडे धाव घेतली. सायबर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता व माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.
- Advertisement -

