- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपुर :-शेतीच्या वादातून सख्खा भाऊ,भावाचा पक्का वैरी झाल्याची घटना नागपूर जिल्ह्याच्या कळमेश्वर तालुक्यात उघडकीस आल्यानंतर अनेकांनी केंद्रीय राखीव दलातून सेवानिवृत्त झालेल्या मारेकऱ्यावर थु-थू केले आहे.चंद्रशेखर रामाजी तुरारे वय ५३ वर्षे असे मारेकरी मोठ्या भावाचे नाव असून तो केंद्रीय राखीव दलात नोकरी करून तीन वर्षापूर्वी सेवानिवृत्त झाला आणि सध्या शेती करत होता.तर अरुण रामाजी तुरारे वय ४३ वर्षे,रा.वॉर्ड क्र.१५,धनगरपुरा,ता.कळमेश्वर, जि.नागपूर असे मृतक लहान भावाचे नाव आहे.मोठ्या भावाने लहान भावाची गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना कळमेश्वर तालुक्यातील मोहगाव-सावंगी शिवारात दोन दिवसांपूर्वी म्हणजेच शनिवारी रात्री घडली.
मृतक अरुण व आरोपी चंद्रशेखर यांचे वडील रामाजी तुरारे यांचे निधन झाले असून,त्यांना तीन मुले व चार मुली आहेत.तिन्ही भावांमध्ये मोठा चंद्रशेखर,मधला अरुण(मृतक)आणि लहान देवेंद्र आहे.वडिलोपार्जित साडेचार एकर शेती तिघांमध्ये प्रत्येकी दीड-दीड एकर वाटून देण्यात आली होती.चंद्रशेखर हा केंदित राखीव दलात(सीआरपीएफ)नोकरी करून तीन वर्षापूर्वी सेवानिवृत्त झाला आणि सध्या शेती करत होता.सर्वात लहान देवेंद्र व मोठा चंद्रशेखर यांची मिळून तीन एकर शेती चंद्रशेखरच कसत होता.चंद्रशेखर हा हिंगणा येथे पत्नी व मुलासह राहत असून,देवेंद्रही हिंगणा येथे भाड्याने राहतो.
घटनेच्या दिवशी शनिवारी १३ डिसेंबरला सकाळी साडे नऊ वाजता अरुण,त्याची ४० वर्षीय पत्नी ज्योत्स्ना व शेत मजूर अनिता बोंद्रे यांच्यासह शेतात गेला होता. अरुणने शेतालगत असलेले त्रिलोचन खरबडे यांचे पाच एकर शेत ठेक्याने घेतले होते.दुपारी तिघांनी शेतातच जेवण केले.त्यानंतर अरुण स्वतःच्या दीड एकर शेतात ट्रॅक्टरने नांगरणी करण्यासाठी गेला. त्यावेळी तो शेतात एकटाच होता,तर ज्योत्स्ना व अनिता कापूस वेचण्यासाठी दुसऱ्या शेतात गेल्या.सायंकाळी पाच वाजता ज्योत्स्ना शेतात परतल्या असता ट्रॅक्टर एकाच ठिकाणी सुरू अवस्थेत उभे होते.बाजूला अरुणच्या चपला व दुपट्टा दिसला. दुपट्ट्यावर रक्ताचे डाग आढळल्याने संशय बळावला.शोध घेऊनही अरुण न सापडल्याने जवळच्या पोलिस चौकीत बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली.अश्यातच त्याच रात्री ११ वाजताच्या सुमारास वन विभागाचे पथक गस्तीवर असतांना चंद्रशेखर व देवेंद्र यांच्या शेतालगतच्या नाल्याजवळ काहीतरी जळत असल्याचे त्यांना दिसले. पाहणी केली असता,तेथे मानवी हाडे व मांस जळालेल्या अवस्थेत आढळले.याची माहिती कळमेश्वर पोलीस ठाण्याचे ठाणेदार मनोज काळबांडे यांना देण्यात आली. पोलिस,ठसेतज्ज्ञ व फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले.त्यानंतर,कौटुंबिक वादाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी चंद्रशेखर तुरारे याला ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशीत त्याने अरुणची हत्या करून पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह नाल्यात टाकून पेट्रोल टाकून जाळल्याची कबुली दिली.मागील तीन वर्षापासून शेतातील विहिरीचे पाणी,मोटर,पाइपलाइन,शेतातील रस्ता व शेतीच्या वाटणीवरून भावांमध्ये सतत वाद सुरू होता.या वादातून यापूर्वीही दोन वेळा पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल झाल्या होत्या.त्यातच,घटनेच्या चार दिवसांपूर्वी बहीण लता झिले(रा.हिंगणा)ही अरुणकडे आली होती.शेतात जाण्यासाठी चंद्रशेखर हा अरुणला अडवत असल्याने, लताने जेसीबीच्या साहाय्याने चंद्रशेखर व देवेंद्र यांच्या शेतालगतच्या नाल्याजवळ रस्ता तयार केला.यावेळी चंद्रशेखर,अरुण व बहीण लता यांच्यात वाद झाला होता.हा प्रकार आरोपीच्या मनात घर करून बसला असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. याप्रकरणी अरुणची पत्नी ज्योत्स्ना यांनी दिलेल्या तक्रारीवरून खून व पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्नाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अरुण हा शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता.त्याला १४ वर्षाचा तन्मय व दहा वर्षांचा सर्वेश अशी दोन मुले आहेत.
- Advertisement -

