- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :-राज्यातील नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देतांना रुग्णालयांची सुरक्षा प्राधान्याची बाब आहे.राज्यातील सर्व शासकीय,खासगी व धर्मदाय आरोग्य संस्थांमधील फायर ऑडिट,विद्युत सुरक्षा,इमारत बांधकाम तसेच रुग्णालयातील संबंधित यंत्राचे ऑडिट करून त्याचा अहवाल शासनास सादर करावा,असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.
राज्यातील आरोग्य संस्थांमध्ये आग प्रतिबंधक उपाययोजना,आपत्कालीन परिस्थितीतील रुग्ण स्थलांतरणाची तयारी आणि विद्युत सुरक्षेची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी आरोग्य विभागाने यापूर्वी विविध स्तरांवर परिपत्रके आणि मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.त्यानुसार,सर्व आरोग्य संस्थांनी अग्निसुरक्षा उपाययोजनांचे नियमित मूल्यांकन करून त्रुटी दूर करणे आवश्यक आहे.
रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या प्रत्येक रुग्णाच्या जीविताची सुरक्षा ही शासनाची सर्वोच्च जबाबदारी असून,अग्निसुरक्षेच्या बाबतीत कोणताही हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही.या पार्श्वभूमीवर फायर ऑडिटसह इमारत,विद्युत व्यवस्था व रुग्णालयातील सर्व संबंधित यंत्रणांचे ऑडिट करून त्यातील त्रुटी तातडीने दूर करण्यावर भर देण्यात यावा अशा सूचना केल्या आहेत.सर्व जिल्ह्यातील शासकीय,खाजगी,धर्मदाय संस्थांमधील ऑडिट करून घेण्याची जबाबदारी रुग्णालय प्रमुख,विभागीय उपसंचालक, जिल्हा शल्यचिकित्सक,जिल्हा आरोग्य अधिकारी , महानगरपालिका आरोग्य अधिकारी,वैद्यकिय अधिक्षक यांना देण्यात आल्या आहेत.
- आयसीयू,एनआयसीयू,ओटीसह महत्त्वाच्या विभागांची विशेष तपासणी👇
रुग्णालयातील आयसीयू,एनआयसीयू,नर्सरी,ऑपरेशन थिएटर(ओटी)यांसारख्या संवेदनशील व महत्त्वाच्या विभागांमधील अग्निसुरक्षा सज्जतेचा विशेष आढावा घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.यासोबतच विद्युत सुरक्षा,वैद्यकीय गॅस पाइपलाइन प्रणाली,आपत्कालीन स्थलांतरण व्यवस्था,अग्निशमन उपकरणांची उपलब्धता व कार्यक्षमता,कर्मचारी प्रशिक्षण आणि मॉक ड्रिल यांचीही तपासणी करण्यात यावी.तपासणीमध्ये आढळून येणाऱ्या त्रुटी व कमतरतांची नोंद करून त्यानुसार प्राधान्यक्रम निश्चित करावा आणि आवश्यक त्या उपाययोजना तातडीने पूर्ण कराव्यात,असेही निर्देश देण्यात आले आहेत.
- सहा महिन्यांच्या चक्रात प्रत्येक इमारत व ब्लॉकची तपासणी👇
रुग्णालयाच्या आवारातील प्रत्येक इमारत व ब्लॉकचा सहा महिन्यांच्या चक्रात क्रमाने अग्निसुरक्षा मूल्यांकनात समावेश केला जाईल,याची संबंधित संस्थांनी दक्षता घ्यावी.केवळ कागदोपत्री फायर ऑडिट न करता प्रत्यक्ष परिस्थितीची तपासणी करून आवश्यक सुधारणा करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
- नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती👇
राज्यातील आरोग्य संस्थांच्या अग्निसुरक्षेची सद्यस्थिती जाणून प्रत्येक आरोग्य संस्थेत अग्निसुरक्षेसाठी नोडल अधिकारी नियुक्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.नोडल अधिकाऱ्यांनी फायर ऑडिट,विद्युत सुरक्षा,अग्निशमन यंत्रणा,आपत्कालीन स्थलांतरण व्यवस्था,कर्मचारी प्रशिक्षण आणि मॉक ड्रिल यांचा नियमित आढावा घेऊन अनुपालनाची माहिती वरिष्ठ स्तरावर सादर करावी.
- संस्थाप्रमुखांची जबाबदारी निश्चित👇
फायर ऑडिटमध्ये झालेल्या दिरंगाईमुळे किंवा सुरक्षा उपाययोजनांमध्ये आढळलेल्या गंभीर त्रुटींमुळे अनुचित घटना घडल्यास संबंधित संस्थाप्रमुखांची जबाबदारी निश्चित केली जाईल,याची स्पष्ट नोंद घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.त्यामुळे प्रत्येक शासकीय व खासगी आरोग्य संस्थेने अग्निसुरक्षेच्या उपाययोजनांकडे गांभीर्याने पाहून आवश्यक ती कार्यवाही वेळेत पूर्ण करणे अपेक्षित आहे.
- नियमित अहवाल सादर करा👇
अग्निसुरक्षा मूल्यांकन आणि केलेल्या कार्यवाहीचा अहवाल नियमितपणे सादर करावा.तसेच केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार अग्निसुरक्षा आणि जीवित सुरक्षेबाबतच्या राष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करावी,असेही आरोग्य मंत्री आबिटकर यांनी स्पष्ट केले आहे.
- Advertisement -

