- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-रंगपंचमीचा उत्सव हा सर्वांसाठी मौज-मजेचा असतो.त्यातच,लहान चिमुकले म्हटले तर घरच्या मंडळींपासून ते अनेकांवर रंग उडवून आनंदोत्सव साजरा करत असतात.मात्र,नागपूरमध्ये एका घटनेमुळे उत्सवाला गालबोट लागल्याची घटना समोर आली आहे. रंग खेळत असतांना समोर आलेल्या चुलत आजीवर रंग उडवला म्हणून संतप्त झालेल्या आजीने आपल्या चार वर्षाच्या नातवावर उकळते गरम पाणी ओतल्याची खळबळजनक घटना नागपूरच्या कोराडी परिसरात घडली आहे.यात चिमुकला ४५ टक्के भाजला असून त्याच्यावर नागपूरच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.सदरची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
सावनेर तालुक्याच्या खापरखेडा येथील रहिवासी चार वर्षीय ओम हरीश वांगे हा घराबाहेर पिचकारीने होळी खेळत होता.त्याचवेळी त्याची चुलत (चिमुकल्याच्या आईची काकू)आजी सिंधू ठाकरे या चुलीवर तापवलेले गरम पाणी बादलीत भरून घराकडे नेत होत्या.ओम हा रंग खेळत असतांना त्याने पिचकारीतील रंग आजीच्या अंगावर उडवला.यामुळे सिंधू ठाकरे यांचा संयम सुटला आणि त्यांनी क्षणाचाही विचार न करता हातातील उकळत्या पाण्याची बादली थेट नातवाच्या अंगावर रिकामी केली.गरम पाणी अंगावर पडताच ओम वेदनेने किंकाळ्या मारू लागला.पाण्याचा चटका इतका तीव्र होता की,त्याचा कमरेखालचा भाग गंभीररीत्या भाजला आहे.मुलाचा आरडाओरडा ऐकून कुटुंबातील सदस्य बाहेर धावून आले.जखमी ओमला तातडीने जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.डॉक्टरांच्या मते,तो सुमारे ४५ टक्के भाजला असून त्याची प्रकृती गंभीर आहे.ओमचे वडील वेकोलीमध्ये कार्यरत आहेत. सदरची हृदयद्रावक घटना परिसरातील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.व्हिडिओमध्ये दिसत आहे की, रागाच्या भरात पाणी ओतल्यानंतर आजीने पुन्हा नातीच्या हातातील थंड पाण्याची बादली घेऊन ती ओमवर ओतली.मात्र, तोपर्यंत ओम गंभीर भाजला गेला होता.घटनेची माहिती मिळताच कोराडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.व्हायरल सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शीच्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.आपल्याच नातवाबाबत आजीने दाखवलेल्या या क्रूरतेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
- व्हायरल व्हिडिओ👇
- Advertisement -

