- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-आकांक्षित गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात जलसंधारण,हवामान बदलाच्या आव्हानांना सामोरे जाणे तसेच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने ‘बोडी-आधारित शेती प्रणाली’ प्रकल्प राबविण्यात येत आहे.या प्रकल्पाच्या माध्यमातून जलसुरक्षा व शाश्वत ग्रामीण उपजीविका निर्माण करण्यावर भर देण्यात आला आहे.
हा प्रकल्प बाडेन ॲनिलीन अॅण्ड सोडा फॅक्टरी (बीएएसएफ)यांच्या अर्थसहाय्याने व बायफ उपजीविका व विकास संस्था यांच्या माध्यमातून राबविण्यात येत असून,याबाबतचा सामंजस्य करार १४ जानेवारी २०२६ रोजी करण्यात आला आहे. प्रकल्पाचा कालावधी १५ जानेवारी २०२६ ते ३१ डिसेंबर २०२६ असा आहे.
- पाच गावांचा समावेश; १ कोटी ३४ लाख रुपयांचा निधी👇
या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात एटापल्ली तालुक्यातील पाच गावांचा समावेश करण्यात आला आहे.प्रकल्पासाठी एकूण १ कोटी ३४ लाख १४ हजार ४०० रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला असून, यापैकी १ कोटी २५ लाख ४८ हजार ४०० रुपये बीएएसएफ संस्थेकडून तर उर्वरित निधी लाभार्थी सहभाग व विविध शासकीय योजनांमधील संलग्नतेतून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
प्रकल्पांतर्गत बोड्यांचे गाळ काढणे,पाणीसाठा वाढविणे आणि सिंचन सुविधा सक्षम करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे.पहिल्या वर्षात ७० हजार घनमीटर गाळ काढणी,७० हजार घनमीटर पाणी साठवण क्षमता निर्माण करणे व ३५० एकर क्षेत्र सिंचनाखाली आणणे अशी उद्दिष्टे निश्चित करण्यात आली आहेत.यामुळे खरीप हंगामात सुमारे ३०० एकर भात क्षेत्राला संरक्षित सिंचन, तर रब्बी हंगामात सुमारे १०० एकर क्षेत्रात शेतीसाठी आवश्यक ओलावा उपलब्ध होणार आहे.या प्रकल्पात सहभागी कुटुंबांचे सध्याचे सरासरी वार्षिक उत्पन्न सुमारे ४५ हजार रुपये असून, टप्प्याटप्प्याने उत्पन्न वाढवून पुढील काही वर्षांत ते दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.तसेच हवामान बदलामुळे निर्माण होणाऱ्या जोखमी कमी करून पीक उत्पादकतेत ३० ते ३५ टक्के वाढ साध्य होणार आहे.
महिला बचत गट व भूमिहीन कुटुंबांना उपजीविकेचा आधार👇
प्रकल्पांतर्गत १० हजार ५०० वनरोपांची लागवड,१०० महिला बचत गट सदस्यांना उत्पन्नवाढीच्या उपक्रमांचे सहाय्य,भूमिहीन कुटुंबांसाठी सूक्ष्म उद्योग सुरू करून शाश्वत उपजीविका निर्माण असे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.यामुळे ग्रामीण महिलांमध्ये उद्योजकता, आर्थिक स्वावलंबन आणि सामाजिक सक्षमीकरणाला चालना मिळणार आहे.
प्रशिक्षण,अहवाल व परिणामांचे दस्तऐवजीकरण👇
या उपक्रमातून ३०० शेतकऱ्यांना थेट लाभ,तर १ हजार ५०० शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.प्रकल्पाच्या परिणामांचे मूल्यमापन करण्यासाठी प्रारंभिक अभ्यास अहवाल,सहामाही व वार्षिक अहवाल तसेच दृकश्राव्य दस्तऐवजीकरण तयार करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने राबविण्यात येणारा हा बोडी-आधारित शेती प्रकल्प जलसंधारण,हवामानस्नेही शेती आणि शाश्वत ग्रामीण विकासाचा आदर्श नमुना ठरत असून,एटापल्ली तालुक्यासह संपूर्ण गडचिरोली जिल्ह्याच्या कृषी विकासाला नवी दिशा देणारा ठरणार आहे.
- Advertisement -

