उद्रेक न्युज वृत्त
मुख्य संपादक/सत्यवान रामटेके
गडचिरोली :- पावसाने काही दिवस हजेरी लावून अनेकांना उकाड्यापासून दिलासा दिला होता.पाऊस पडल्याने शेतीच्या मशागतीची कामे शेतकऱ्यांनी जोमाने सुरू केली.अशातच आता पाऊस माघारी फिरला असल्याचे सर्वत्र चित्र दिसू लागले आहेत. पावसाने फक्त नावापुरता झलक दाखवित दडी मारल्याने शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांचा जीवही कासावीस झाला आहे. हवामान खात्याने पाऊस पडण्याचा दिनांक- २८ जून पर्यंत गडचिरोली, चंद्रपूर,भंडारा,गोंदिया,नागपूरसह वर्धा जिल्ह्यात यलो अलर्टचा इशारा दिला आहे. दरम्यान आतापर्यंत व सध्या तरी पावसाची चिन्हे दिसत नाहीत.आकाशात दररोज ढग जमतात आणि पाठ फिरवून निघून जातात.जिल्ह्यात निम्मा जून महिना व मृग नक्षत्र कोरडा गेल्यावर पावसाचे आगमन झाले. दोन तीन दिवस चांगला पाऊस झाल्याने आता त्यात सातत्य राहील; अशी अपेक्षा होती.परंतु,ती फोल ठरली.पाऊस येऊन बेपत्ता झाल्याने वातावरणात पुन्हा उकाडा वाढला आहे.सकाळपासून टळटळीत उन पडत आहे.लोकांच्या घरातील कूलर अद्यापही लावलेलेच आहे.जून हा पावसाळ्याचा महिना मानला जातो.मात्र,जून महिना संपण्याच्या बेतात आहे. तरीसुद्धा पावसाचा जोर नाही.त्यामुळे खरीप हंगामातील कामे लांबणीवर पडली आहेत.ज्यांनी चार दिवसांच्या पावसाच्या भरोश्यावर पेरण्या केल्या त्या पावसाअभावी संकटात सापडल्या आहेत. उकाड्यामुळे गरमी व आरोग्याच्या समस्या पुन्हा निर्माण झाल्या आहेत.त्यामुळे पाऊस केव्हा पडणार याकडे सर्वांच्या नजरा भिडल्या आहेत.

