उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- पहिल्या टप्प्यात १९ एप्रिलला लोकसभा निवडणुका होत असल्याने तालुका महसूल प्रशासन निवडणुकीत व्यस्त आहे. याचा फायदा घेत रेती चोरटे हे अधिकच सक्रिय झाले आहेत. देसाईगंज,आरमोरी,कुरखेडा तसेच इतर तालुक्यातील विविध नदी घाटातून रात्रीच्या सुमारास ट्रॅक्टरद्वारे रात्रभर रेतीची चोरी करून विक्री केली जात आहे.
अनेक नदी घाटांतून रेती चोरीचा सिलसिला रात्री सुरू असतो.गेल्या पंधरा दिवसांपासून प्रशासन व महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त आहेत.त्यामुळे रेती चोरीने गती पकडली आहे.गडचिरोली जिल्ह्यात रेतीघाटाची लिलाव प्रक्रिया रखडली आहे.शिवाय नदी नाल्यात शेती गेलेल्या शेतकऱ्यांनी शेतीची दुरुस्ती करण्यासाठी रेती उपशाची परवानगी देण्यात येत होती.ती परवानगी देणेही सध्या बंद आहे.असे असतानाही चोरीच्या रेतीवर अनेक बांधकामे सुरू आहेत.सदर बांधकामे विना रॉयल्टी चोरीच्या रेतीवर सुरू असून ट्रॅक्टरद्वारे रेती चोरांची टोळी सर्वत्र सक्रिय झाली असून रेती चोरट्यांनी नदीचे पात्र पोखरून टाकले आहे.प्रशासनाच्या निवडणुकीतील व्यस्ततेमुळे रेती चोरीला जोम आला आहे.चोरीच्या रेतीवर अनेक बांधकामे सुरू आहेत.रेती चोरी सापडू नये यासाठी तस्कर नेहमी सतर्क असतात.दरम्यान महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या हालचालींवर गुप्त पाळत ठेवली जात आहे.दिवसभर आराम करायचा आणि रात्रभर नदीचे पात्र पोखरायचे असा गोरखधंदा रेती तस्करांकडून सुरू आहे.

